आॅनलाईन व्यवहार न करणाऱ्या १५ रेशन दुकानांची अनामत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 15:55 IST2019-02-09T15:52:42+5:302019-02-09T15:55:21+5:30
कोल्हापूर जिल्ह्याचे आॅनलाईन रेशन व्यवहार हे ९४ टक्के असूनही करवीर तालुक्यातील दुकानांमध्ये ८० टक्केच्या आतच व्यवहार होत आहेत. हे चित्र अनेक दिवसांपासून कायम राहील्याने जिल्हा पुरवठा विभागाने धडक कारवाई करत १५ दुकानांची अनामत रक्कम जप्त केली. शहरासह इतर तालुक्यात ही अशाच पध्दतीने मोहिम राबविणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी यांनी शनिवारी सांगितले.

आॅनलाईन व्यवहार न करणाऱ्या १५ रेशन दुकानांची अनामत जप्त
कोल्हापूर : जिल्ह्याचे आॅनलाईन रेशन व्यवहार हे ९४ टक्के असूनही करवीर तालुक्यातील दुकानांमध्ये ८० टक्केच्या आतच व्यवहार होत आहेत. हे चित्र अनेक दिवसांपासून कायम राहील्याने जिल्हा पुरवठा विभागाने धडक कारवाई करत १५ दुकानांची अनामत रक्कम जप्त केली. शहरासह इतर तालुक्यात ही अशाच पध्दतीने मोहिम राबविणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी यांनी शनिवारी सांगितले.
आॅनलाईन द्वारे रेशनवरील व्यवहारांचे प्रमाण कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करवीर तालुक्यातील संबंधित रेशन दुकानांना नोटीस पाठविण्यात आल्या. परंतु त्यानंतरही व्यवहाराचे प्रमाण कमीच राहीले. जिल्ह्यातील इतर दुकानांमधील आॅनलाईन व्यवहाराचे प्रमाण हे ९४ ते ९५ टक्केच्या आसपास आहे.
मात्र, करवीरमधील या दुकानांमध्ये ८० टक्केच्या आतच व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा पुरवठा विभागाने त्यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. त्यावर दहा दुकानांनी याकडे पाठ फिरविली तर पाच जणांनी उपस्थित राहून म्हणणे मांडले असले तरी समाधानकार खुलासा करु शकले नाहीत. त्यामुळे पुरवठा विभागाने नुकतीच धडक कारवाई केली.
यामध्ये शेतकरी सहकारी संघ,शाखा(कांचनवाडी), शेतकरी सहकारी संघ शाखा (परिते), शेतकरी सहकारी संघ शाखा (बालिंगा), उत्तम रास्त भाव धान्य दुकान (नागदेववाडी), ज्ञानेश्वर विकास सेवा संस्था (शिंगणापूर), व्ही.टी. भिवटे रास्त भाव धान्य दुकान (उचगाव), रासाई विकास सेवा संस्था (घानवडे), श्रीराम विकास सेवा संस्था (शिंगणापूर), महालक्ष्मी महिला बचत गट (कांचनवाडी) यांच्यावर शंभर टक्के अनामत रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपये जप्त करण्याची कारवाई केली आहे. तर छत्रपती विकास सेवा संस्था (उचगाव), पांडुरंग विकास सेवा संस्था (सांगरुळ), हनुमान विकास सेवा संस्था (शिये), कुरुकली विकास सेवा संस्था (कुरुकली), शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ (शिरोली दुमाला) यांच्यावर पन्नास टक्के अनामत रक्कम एक हजार रुपये जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
रेशनवरील आॅनलाईन व्यवहार सातत्याने कमी होत असल्याने संबंधित दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील त्रुटींची पुनरावृत्ती झाल्यास या दुकानांचे परवाने रद्द केले जातील. लवकरच जिल्हयात सर्वच ठिकाणी ही कारवाई होणार केली जाईल.
-अमित माळी,
जिल्हा पुरवठा अधिकारी