विभागीय क्रीडा संकुल : ठेकेदाराला नोटीस; दुधाळीच्या रेंजलाही मिळणार ४० लाखांचा निधी
By Admin | Updated: November 30, 2014 01:01 IST2014-11-30T00:26:00+5:302014-11-30T01:01:51+5:30
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील

विभागीय क्रीडा संकुल : ठेकेदाराला नोटीस; दुधाळीच्या रेंजलाही मिळणार ४० लाखांचा निधी
कोल्हापूर : विभागीय क्रीडासंकुलाचे काम जलद पूर्ण करा आणि त्याचा क्रीडापटूंना लाभ द्या. ज्या क्रीडामैदानांचे काम पूर्ण झाले आहे, ती खेळाडूंसाठी सुरू करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागीय क्रीडासंकुलाच्या आढावा बैठकीत दिले.
विभागीय क्रीडासंकुलाची आढावा बैठक सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी विभागीय क्रीडासंकुलाचे आतापर्यंतचे कामकाज, दर्जा, उर्वरित कामे यांसाठी आवश्यक निधी यांचा सविस्तर आढावा घेतला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मागणीप्रमाणे वाढीव दराने किती खर्च येणार आहे, याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे सांगून या क्रीडासंकुलाचे काम उर्वरित कामांसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याबाबत चर्चा केली.
याचबरोबर गेली अनेक वर्षे अनेक समस्यांनी ग्रासलेल्या व आंतरराष्ट्रीय नेमबाज जयसिंग कुसाळे, रमेश कुसाळे, तेजस्विनी सावंत, सध्याचे जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे, आदींचा नेमबाजीचा प्राथमिक सराव ज्या शूटिंग रेंजवर झाला, त्या दुधाळी मैदान येथील शूटिंग रेंजचाही कायापालट करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले आहेत. यासाठी त्यांनी स्वत:च्या निधीतून दहा लाख, आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून दहा लाख व जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून अन्य वीस लाखांचा निधी देण्यात येईल. या बैठकीत आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)