सदर बझार परिसरातील कत्तलखाना परवानगीस नकार

By Admin | Updated: September 4, 2014 00:06 IST2014-09-04T00:05:38+5:302014-09-04T00:06:42+5:30

प्रदूषण नियंत्रण मंडळ; मनपा आयुक्तांना बजावली नोटीस

Denial of slaughter house permission in Sadar Bazaar area | सदर बझार परिसरातील कत्तलखाना परवानगीस नकार

सदर बझार परिसरातील कत्तलखाना परवानगीस नकार

कोल्हापूर : सार्वजनिक ठिकाणी सांडपाण्यापासून प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या अटीवर एका व्यक्तीला तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना सुरू करण्यास परवानगी देणाऱ्या महानगरपालिका प्रशासनास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज, बुधवारी झिडकारले. सदरबझार येथील कत्तलखाना तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यास परवानगी देता येणार नाही, अशी नोटीसच मंडळाने पालिका आयुक्तांना बजावली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने मे. इरफान बेपारी व इतरांना कत्तलखाना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना पालिकेने संबंधित व्यापाऱ्यांवरच कत्तलखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यापासून प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याची अट घातली आहे. यासंबंधीची माहिती प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे दिलीप देसाई यांना मिळताच त्यांनी काल, मंगळवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार करून याकडे लक्ष वेधले होते.
तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सु. सं. डोके यांनी आज महापालिक ा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना नोटीस बजावली. सदरबझार येथील कत्तलखान्यातील सर्व क्रिया-प्रक्रिया व त्याद्वारे निर्माण होणाऱ्या प्रदूषित घटकांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पूर्णत: महापालिकेची आहे. ती पार पाडण्याची हमी दिल्याखेरीज कत्तलखान्याला परवानगी देता येणार नसल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
हा कत्तलखाना पूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीशिवाय कार्यरत होता. निर्गत होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्यरत नसल्याने सांडपाणी नाल्याद्वारे थेट नदीत सोडण्यात येत होते. जनावरांच्या रक्तावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. मंडळाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन कत्तलखान्याद्वारे करण्यात आले नाही, आदी त्रुटी लक्षात घेऊन १९ सप्टेबर २०११ रोजी कत्तलखाना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून तो बंद आहे. मात्र, या कोणत्याही त्रुटी दूर न करता तो चालविण्यास देण्याचा घाट मनपाच्या काही अधिकाऱ्यांनी घातला आहे. आज त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने साफ झिडकारले.

Web Title: Denial of slaughter house permission in Sadar Bazaar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.