१० हजार लसींची मागणी, मिळतात दीड हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:33+5:302021-05-12T04:23:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : करवीर तालुक्यात आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरणासाठी दहा हजार लसींची मागणी केली आहे. पण प्रत्यक्षात ...

१० हजार लसींची मागणी, मिळतात दीड हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : करवीर तालुक्यात आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरणासाठी दहा हजार लसींची मागणी केली आहे. पण प्रत्यक्षात दीड ते दोन हजार लसींचाच पुरवठा होत आहे. यामुळे लसीकरणाची मोहीम अडखळत सुरू ठेवण्याची कसरत आरोग्य विभागाला करावी लागत आहे. ऑनलाईन लसीकरण नोंदणी करणाऱ्या लोकांना संदेश येतात, पण लसच उपलब्ध होत नसल्याने त्यांना लस न घेताच माघारी फिरावे लागत आहे. अनेक ठिकाणी लसीकरणाच्या रांगाच्या रांगा आरोग्य केंद्राबाहेर पाहायला मिळत आहेत.
करवीर तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरू झाली. एप्रिलच्या मध्यापर्यंत ती संथगतीने होती. पण शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट निर्माण झाल्याने दररोज शेकडो लोक कोरोनाबाधित होत आहेत. करवीर तालुक्यातील गावा-गावात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
दररोज शंभर-सव्वाशे असणारी कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी २११ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या दर दिवशी सहा ते सात आहे. दुसऱ्या लाटेत करवीर तालुक्यात २ हजार ६४९ वर पोहोचली आहे. या कोरोनाबाधितांना योग्य उपचार मिळण्यासाठी यातायात करावी लागत आहे. तालुक्यात शिंगणापूर, केआयटी ही दोनच कोविड केंद्रे आहेत. पण येथे केवळ दोनशे रुग्णांचीच सोय होऊ शकते.
करवीर तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील ३ लाख ५० हजार, तर ४५ वयोगटावरील १ लाख ६० हजार जनता कोरोना लसीकरणासाठी लाभार्थी आहेत. पण लसीचा मोठा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम अडखळत सुरू आहे. दररोज १० हजार लसींची मागणी होते. पण पुण्याहून करवीर तालुक्यासाठी केवळ दीड-दोन हजारच डोस येत असल्याने लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा दिसत आहेत. येथूनही कोरोनाचा समूहसंसर्ग होण्याची दाट शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
प्रतिक्रिया...
कोरोना लसीकरणासाठी मिळणारी लस अत्यंत तुटपुंजी मिळत असल्याने आणि तीही वेळेत मिळत नसल्याने लोकांना रांगेत तिष्ठत बसावे लागत आहे. याचा राग आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर व्यक्त करून वादावादीचे प्रकार पण घडत आहेत. तरीही कर्मचारी संयमाने ही मोहीम राबविण्याचा प्रयत्न करत आहेत.
- जी. डी. नलवडे,
करवीर तालुका आरोग्य अधिकारी.
(फोटो)
खाटांगळे ता. करवीर येथे कोरोना लसीकरणासाठी भली मोठी रांग होती. यात वयोवृद्धांची संख्या मोठी दिसत होती.