आदर्श गावाचा हवा निर्धार

By Admin | Updated: July 30, 2015 00:31 IST2015-07-29T23:58:31+5:302015-07-30T00:31:24+5:30

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख

Define the air of the ideal village | आदर्श गावाचा हवा निर्धार

आदर्श गावाचा हवा निर्धार

गावचे कारभारी म्हणून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची अनेक वर्षांपासूनची ओळख असते. त्यामुळे गावचे कारभारी होण्यासाठी टोकाची ईर्ष्या असते. कारभाऱ्यांचा कारभार चांगला असल्यास गावचा विकास गतीने होतो. ‘आमचं गाव आमची एकी, अजून बरंच काम बाकी’ हा ध्यास घेऊन काम केलेल्या ‘कारभाऱ्यांच्या’ गावांनी विकासाचे तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित सदस्यांवर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. प्रत्येक सदस्याने निर्धार केल्यास आदर्श गाव होते. सर्वांगीण विकास कसा करावा, अधिकारी, पदाधिकारी यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या, प्रशासन आणि गावचे कारभारी यांचे संबंध कसे असावेत, प्रभावी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी काय करावे, या विषयांवर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्यात येथील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख नामांकित आहेत. नुकत्याच जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन नवे कारभारी विराजमान झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला थेट संवाद...

प्रश्न : सदस्य झाल्यानंतर काय करायला हवे?
उत्तर : सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत कामकाज, नियम, अधिनियम, आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक सदस्याने प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित राहून आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या, शासनाच्या योजना यांची सविस्तर माहिती करून घ्यावी. तज्ज्ञ मार्गदर्शक धडे देत असल्यामुळे सदस्यांना भविष्यात काम करताना प्रशिक्षणाचा चांगला उपयोग होत असतो.
प्रश्न : सर्वांगीण विकासासाठी सदस्य काय योगदान देऊ शकतात?
उत्तर : सर्व सदस्यांनी एकजुटीने निर्धार केल्यास गावाचा कायापालट होऊ शकतो. राज्यात विकासात आदर्श असलेले राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, लोधवडे अशा गावांना भेटी दिल्या पाहिजेत. या गावांत राबविलेल्या विकासाचा पॅटर्न आपल्या गावात राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रत्येक सदस्याने शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून आपले वॉर्ड आदर्श केल्यास गाव आदर्श होईल. त्यासाठी निवडून आल्यानंतर गट-तट बाजूला ठेवून पारदर्शीपणे लोकसहभाग घेऊन योजनांची अंमलबजावणी करावी. ग्रामसेवकांच्या माध्यमातून योजनांचा पाठपुरावा करावा.
प्रश्न : ग्रामसभेला उपस्थिती वाढविण्यासाठी काय करायला हवे?
उत्तर : शासनाने ग्रामसभेला जादा अधिकार दिले आहेत. विकासकामांचा आराखडा तयार करताना ग्रामसभेचा ठराव महत्त्वाचा असतो. मात्र, ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहत नसल्यामुळे सर्व विषयांवर चर्चा होत नाहीत. त्यामुळे वॉर्डात फिरून सदस्यांनी ग्रामसभेचे महत्त्व सांगणे गरजेचे आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून विकासाच्या निर्णय प्रक्रियेत कसे सहभागी होता येते, हे पटवून सांगितल्यानंतर गर्दी होईल. सर्वांगीण चर्चा होईल. त्यासाठी वॉर्डातील सदस्यांनी अग्रेसर राहिले पाहिजे. १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला ग्रामसभा होतात. या दिवसांच्या आधी महिलासभा होत असतात. त्यालाही महिलांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
प्रश्न : मूलभूत सुविधांशिवाय काय करायला हवे?
उत्तर : वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांकडे सदस्यांनी लक्ष दिलेच पाहिजे. याशिवाय चराई, कुऱ्हाड, नस, नशा यावर बंदी अशा सूत्रांची अंमलबजावणी केल्यास गाव विकासात तीर्थक्षेत्र बनेल. अशक्य असे काहीही नसते. सकारात्मकता, नि:स्वार्थी, विकासात्मकदृष्टी ठेवून धडपडत राहिल्यास गावचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे. गावातील विविध विषयांतील ज्ञानी, नि:स्वार्थी लोकांना एकत्र करून काम केल्यास विकासकामे गतीने करता येतात.
प्रश्न : गावपातळीवरच तक्रारी, अडचणी सोडविणे शक्य आहे का?
उत्तर : गावपातळीवर सुटायला हव्या अशा अनेक अडचणी, समस्या तालुका, जिल्हा पातळीवर येत असतात. सर्व सदस्यांनी एकीने कामकाज करीत गावपातळीवरच अडचणी सोडविण्याची व्यवस्था निर्माण करणे शक्य आहे. राजकारण विरहित ही व्यवस्था कार्यान्वित केल्यास सर्वसामान्य ग्रामस्थालाही गावपातळीवरच सहज न्याय मिळू शकेल. पदाधिकारी आणि अधिकारी, कर्मचारी ही विकासाची दोन चाके आहेत. एकमेकांच्या समन्वयाने कारभार करण्यावर सदस्यांनी भर दिल्यास प्रशासनालाही अधिकाधिक योजना राबविणे शक्य होते.
- भीमगोंडा देसाई

Web Title: Define the air of the ideal village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.