संध्यामठला हरवून प्रॅक्टिस (अ)ची आगेकूच
By Admin | Updated: May 26, 2017 01:03 IST2017-05-26T01:03:15+5:302017-05-26T01:03:15+5:30
फुटबॉल महासंग्राम : १७ वर्षांखालील गटात प्रॅक्टिस, गडहिंग्लज, खंडोबाची प्रतिस्पर्ध्यांवर मात; नितांत कोराणेचे ४ गोल

संध्यामठला हरवून प्रॅक्टिस (अ)ची आगेकूच
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूट (साई)तर्फे रामभाऊ चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ‘फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेत गुरुवारी प्रॅक्टिस क्लब (अ)ने संध्यामठ तरुण मंडळाविरुद्धचा सामना १-०ने जिंकला; तर १७ वर्षांखालील गटात प्रॅक्टिस क्लब, गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल संघ, खंडोबा तालीम मंडळाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आगेकूच केली.
शाहू स्टेडियम येथे दुपारच्या सत्रात पीटीएम (ब) व प्रॅक्टिस क्लब यांच्यात झाला. या सामन्यात ‘पीटीएम’कडून रोहित देवणे, जय हंचनाळे, हृषिकेश ढेरे, फयीम शेख यांनी, तर ‘प्रॅक्टिस’कडून सिद्धेश ढोबळे, ओम पोवार, सिद्धेश पाडळकर यांनी चांगला खेळ केला. संपूर्ण वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्यात आला. यात प्रॅक्टिसने २-१ने विजय मिळविला.
दुसऱ्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड संघाने बालगोपाल तालीम मंडळावर २-० अशी मात केली. यात गडहिंग्लजकडून सहाव्या मिनिटास ओंकार पाटीलने, तर २२ व्या मिनिटास सागर पोवारने गोल केला. ‘बालगोपाल’कडून रणजित पोवार, सिद्धेश पिसे, सिद्धांत पाटील, प्रथमेश पाटील यांनी, तर ‘गडहिंग्लज’कडून ओंकार वेलगुडकर, सुलतान शेख, ओंकार पाटील, रोहित साळोखे यांनी चांगला खेळ केला.
तिसऱ्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघावर ५-० अशी एकतर्फी मात केली. यात ‘खंडोबा’कडून नितांत कोराणे याने ४, तर कुणाल चव्हाण याने एक गोल नोंदविला. ‘उत्तरेश्वर’कडून शोएब बागवान, रोहित सुतार, साई माने, अनिकेत माने यांनी, तर ‘खंडोबा’कडून आदित्य भागलेकर, ओंकार रायकर, प्रणव घाटगे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
विद्युतझोतात रात्री आठ वाजता वरिष्ठ गटात प्रॅक्टिस क्लब (अ) व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून प्रॅक्टिसचे वर्चस्व राहिले. यात राहुल पाटील, सागर चिले, सुशांत अतिग्रे यांनी, तर संध्यामठकडून अजिंक्य गुजर, आशिष पाटील, रोहित पौंडकर यांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. १७व्या मिनिटास प्र्रॅक्टिसकडून सागर चिलेने गोलरक्षक पुढे आल्याची संधी साधत गोल नोंदवीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच गोलसंख्या कायम राखत सामनाही ‘प्रॅक्टिस’ने जिंकला.
आजचे सामने
१७ वर्षांखालील गटातील सामने
दु. ३.३० वा. : संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध करवीर फुटबॉल संघ
सायं. ५.०० वा. शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध साईनाथ स्पोर्टस
सायं. ६.३० वा. पीटीएम विरुद्ध जुना बुधवार तालीम मंडळ
वरिष्ठ गट सामना
रात्री : ८ वा. गडहिंग्लज युनायटेड विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ