दूध पावडरच्या दरातील घसरण थांबेना, गाय दूध उत्पादक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 05:58 PM2023-07-06T17:58:06+5:302023-07-06T17:58:23+5:30

आगामी काळात पुन्हा दुधाचे उत्पादन वाढणार असल्याने अतिरिक्त दुधाचे करायचे काय? असा दूध संघांपुढे पेच

Decline in the price of milk powder, Cow milk producers in trouble | दूध पावडरच्या दरातील घसरण थांबेना, गाय दूध उत्पादक अडचणीत

दूध पावडरच्या दरातील घसरण थांबेना, गाय दूध उत्पादक अडचणीत

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : गायीच्या दुधाला चांगले भाव मिळू लागल्याने शेतकरी दूध व्यवसायाकडे वळला आणि उत्पादन वाढले. आता उत्पादन वाढल्याने दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यात दूध पावडरच्या दरातील घसरण थांबत नसून महिनाभरात किलोमागे पुन्हा १५ रुपयांची घसरण झाली आहे. आगामी काळात पुन्हा दुधाचे उत्पादन वाढणार असल्याने अतिरिक्त दुधाचे करायचे काय? असा पेच दूध संघांपुढे आहे.

आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत दूध व दूध पावडरची मागणी वाढल्याने जानेवारीपासून दूध संघांनी उत्पादन वाढीसाठी कंबर कसली. दुधाबरोबरच दूध पावडर व बटरच्या दरात वाढ होत गेल्याने दुधाची कमी पडू लागली. दूध पावडर प्रतिकिलो ३३५, तर बटर ४४० रुपयांपर्यंत पोहोचले होते. दूध संघांनी शेतकऱ्यांना गायी, म्हशी खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून गायी खरेदी केल्या. गायीच्या दुधाला किमान ३७ रुपये दर मिळत होता, त्यामुळे पशुखाद्य कंपन्यांनी खाद्याच्या दरातही वाढ केली.

साधारणता ऑक्टोबरनंतर दूध वाढत जाते, त्यानंतर दूध दर कमी होतात. मात्र, यंदा जुलै महिन्यातच दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.

असे आहेत पशुखाद्याचे दर (५० किलो) :

महालक्ष्मी गोल्ड : १२६० रुपये
इतर कंपन्यांचे : १२६० रुपये
समृद्धी : १६७५
भुस्सा : ११६० रुपये

‘पणन’ने कच्चा माल खरेदी करावा

पशुखाद्याच्या दरवाढीमागे व्यापारीच कारणीभूत आहेत. खाद्यासाठी लागणारा कच्चा माल व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने घेऊन तोच माल पशुखाद्य कंपन्यांना चढ्या भावाने विक्री करतात. यासाठी शासनाने ‘पणन’ विभागाच्या माध्यमातून कच्चा माल खरेदी करून दूध खाद्य उत्पादक कारखान्यांना दिला तर दरावर नियंत्रण राहू शकते.

गाय पावडर व बटरच्या दरात अशी झाली घसरण -
उत्पादन-दोन महिन्यांपूर्वीचा दर - सध्याचा दर
पावडर   -  ३३५    -   २३५
बटर       -  ४४०    -   ३६०


दूध कमी पडू लागले म्हणून संघांनी गायी खरेदी करण्यास सांगितले. आता दर कमी केले, मग आता गायी विकायच्या का? दर कमी केल्याने उत्पादन व खर्चाचा मेळ बसत नाही. - संदीप पाटील ( दूध उत्पादक शेतकरी)

Web Title: Decline in the price of milk powder, Cow milk producers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.