आयुष्यात काय करायचे त्याचे धोरण ठरवा
By Admin | Updated: July 16, 2015 00:44 IST2015-07-16T00:44:51+5:302015-07-16T00:44:51+5:30
अमित सैनी : शिवाजी विद्यापीठात कौशल्य विकास सामग्रीचे वितरण

आयुष्यात काय करायचे त्याचे धोरण ठरवा
कोल्हापूर : कौशल्य विकासाचा कार्यक्रम हा एक दिवसाचा नाही. विद्यार्थ्यांनी आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, त्याचे धोरण ठरवावे. विद्यार्थ्यांनी आपली अंगभूत कौशल्ये ओळखून त्यांचा विकास घडवून आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी येथे केले. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अकरा महाविद्यालयांना कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या सामग्रीचे वाटप करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळ, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्रातर्फे आयोजित युवा कौशल्य विकास दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, शासकीय, निमशासकीय नोकरी सर्वांना मिळणे अशक्य असते; त्यामुळे रोजगार, स्वयंरोजगाराची वाट चोखाळणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने या कौशल्य विकास कार्यक्रमाचे महत्त्व आहे. शासनाकडे रोजगार-स्वयंरोजगार विकासाच्या अनेक योजना आहेत. तथापि, त्या योजनांसाठी लाभार्थी शोधताना आमची दमछाक होते. अशा योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षण घेऊन चालणार नाही. त्यांना कोणते ना कोणते कौशल्य आत्मसात करावे लागेल. आयुष्यातील विविध लढायांसाठी कौशल्ये ही आपली साधने आहेत. विद्यापीठातील कॅम्पसवरील विद्यार्थ्यांचे कौशल्य मापन करून त्यातून त्यांना आवश्यक प्रशिक्षण व साधनसामग्री उपलब्ध करण्याचा मानस आहे. महिला व मुली चारचाकी वाहने कमी चालवितात. त्यांच्यासाठी कॅम्पसवरच प्रशिक्षण व परवाना उपलब्ध करण्याच्या दृष्टीने परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. युवा जागर अभियानाचे यशवंत शितोळे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांची भाषणे झाली. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते. ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. बी. कोळेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
एन.एस.डी.सी.च्या कार्यक्रमांतर्गत दहा वर्षांत विद्यापीठ परिक्षेत्रात ५० स्मार्ट सेंटरची स्थापना केली जाईल. त्याद्वारे सुमारे सव्वा लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षित करण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, आॅटोमोबाईल, बँकिंग, लोह व धातू उद्योग, विमा तसेच ई-कॉमर्स या क्षेत्रांवर भर देण्यात येणार आहे.
- यशवंत शितोळे,
युवा जागर अभियान