अधिवेशन काळात निर्णय घ्या, अन्यथा तीव्र संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:02 IST2021-03-02T11:59:15+5:302021-03-02T12:02:14+5:30
Mahavitran Kolhapur- राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे, या काळातच वीज बिल माफीचा निर्णय घ्या, अन्यथा जनतेचा उद्रेक बघा, असा इशारा इरिगेशन फेडरेशनने महावितरणला दिला. लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची वीज बिले कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही, याचा पुनरुच्चार करत ऑक्टोबरनंतरची बिले द्या, लगेच भरतो अशी ऑफरही महावितरणला दिली.

कोल्हापुरात इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांच्या नेतृत्वाखालील वीज ग्राहकांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
कोल्हापूर : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे, या काळातच वीज बिल माफीचा निर्णय घ्या, अन्यथा जनतेचा उद्रेक बघा, असा इशारा इरिगेशन फेडरेशनने महावितरणला दिला. लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची वीज बिले कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही, याचा पुनरुच्चार करत ऑक्टोबरनंतरची बिले द्या, लगेच भरतो अशी ऑफरही महावितरणला दिली.
विक्रांत पाटील किणीकर, बाबासाहेब पाटील भुयेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांची भेट घेऊन वसुली मोहीम थांबवा, अशी विनंती करत ऑक्टोबरनंतरची बिले देण्याची ऑफर दिली. यासंदर्भात वारंवार शांततेने गाऱ्हाणे मांडून देखील सरकार लक्ष देत नसल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आली आहे. वसुलीला येणाऱ्या वायरमनला गावागावात आक्रमक पद्धतीने रोखले जात आहे.
आता महावितरण आणि शासनानेही जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तातडीने निर्णय घेऊन कोरोनाकाळात भरडलेल्या जनतेला दिलासा द्यावा, नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले गेले. या संघर्षात जर महावितरणचे नुकसान झाले तर त्यास आम्ही जबाबदार असणार नाही, असा इशाराही दिला. या शिष्टमंडळात शिवाजी माने, रमेश मोरे, आर. के. पाटील, संजय पाटील, सचिन जमदाडे यांचाही समावेश होता.