कोल्हापूर : माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून गुवाहाटीतून शेअर केलेल्या व्हिडीओमधून मला जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सोमवारी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.इंगवले यांनी शिवाजी पेठेतील जनता बझारच्या दारात नव्यानेच सुरु केलेल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयावर लावलेला क्षीरसागर यांचा फलक शनिवारी (दि.२५) फाडून टाकला. अन् मोर्चातही क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली. त्याची दखल घेत क्षीरसागर यांनी व्हिडिओ शेअर करत इंगवलेंना धमकीवजा इशारा दिला. त्यामध्ये त्यांनी इंगवले यांना तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे. तू माझ्या नादाला लागू नकोस अन्यथा सोडणार नाही अशी थेट धमकीच दिली होती. त्या व्हिडीओच्या आधारे इंगवले यांनी पोलिस अधीक्षकांकडे ही तक्रार केली.क्षीरसागर यांनीच इंगवले यांना शिवसेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. परंतू गेल्या सहा महिन्यापूर्वी या दोघांत वाद सुरु झाला. त्याचा परिणाम म्हणून इंगवले यांचे पद तडकाफडकी काढून ही जबाबदारी जयवंत हारुगले यांना देण्यात आली. क्षीरसागर यांनीच आपले पद काढून घेतल्याचा राग इंगवले यांना आहे. त्यातून हा संघर्ष सुरु झाला असून त्याला राज्यातील बंडाळीचे निमित्त घडले आहे.
राजेश क्षीरसागरांकडून जीवे मारण्याची धमकी, रविकिरण इंगवलेंची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:20 IST