पन्हाळ्यात तटबंदीवरून पडलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू, मराठी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडली होती दुर्घटना
By उद्धव गोडसे | Updated: March 28, 2023 19:23 IST2023-03-28T19:22:17+5:302023-03-28T19:23:40+5:30
उपचार खर्चाच्या वादातून दिवसभर मृतदेह रुग्णालयातच पडून

पन्हाळ्यात तटबंदीवरून पडलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू, मराठी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडली होती दुर्घटना
कोल्हापूर : पन्हाळा येथे सज्जा कोठी परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना सेटवरील घोड्यांची देखभाल करणारा तरुण तटबंदीवरून पडून गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान आज, मंगळवारी (दि. २८) पहाटे जखमी नागेश प्रसांत खोबरे (वय १८, रा. हिप्परगा, जि. सोलापूर) याचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
पन्हाळा येथे महेश मांजरेकर निर्मित वेडात मराठे वीर दौडले सात या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रीकरणादरम्यान १९ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास सज्जा कोठी परिसरात नागेश खोबरे हा मोबाइलवर बोलत तटबंदीकडे गेला. अंधारात तटबंदीचा अंदाज न आल्याने खाली पडून नागेश गंभीर जखमी झाला होता. हा प्रकार लक्षात येताच नागेश याला कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मंगळवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उपचार खर्चाचा वाद
जखमी नागेशला उपचारासाठी दाखल केल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बोलवलेल्या व्यवस्थापकांनी त्याच्या उपचाराचा खर्च देण्याचे नातेवाईकांकडे कबूल केले होते. मात्र गेल्या दहा दिवसात काहीच खर्चाची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तसेच उपचाराचे पैसे मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मंगळवारी दिवसभर मृतदेह रुग्णालयातच पडून होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.