मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्त नोंदणीची मुदत चार महिने- सहजिल्हा निबंधक भुते यांची माहिती : गर्दी न करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:07+5:302021-03-24T04:22:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त खरेदी केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी ...

मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्त नोंदणीची मुदत चार महिने- सहजिल्हा निबंधक भुते यांची माहिती : गर्दी न करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त खरेदी केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्रभारी सह जिल्हा निबंधक एम. एस. भुते यांनी मंगळवारी केले.
राज्य शासनाच्या २९ ऑगस्ट, २०२० च्या राजपत्रानुसार, कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या, तसेच २९ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे भाडेपट्टा या दस्तऐवजांवर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर २०२० ला संपणाऱ्या कालावधीकरिता ३ टक्के, तर १ जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या व ३१ मार्च २०२१ ला संपणाऱ्या कालावधीकरिता २ टक्क्यांनी कमी केले आहे. शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत ३१ मार्च २०२१ अखेर असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील १८ दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून निष्पादित करून मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मार्चअखेर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करता नंतरही सोयीनुसार या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुते यांनी केले आहे.
मुद्रांक शुल्क सवलत योजना अशी
महापालिका हद्दीत
खरेदी-विक्री व्यवहार : ४ टक्के
बक्षीसपत्रांसाठी : अर्धा टक्का
एक एप्रिलनंतर
खरेदी-विक्री व्यवहार : ६ टक्के
बक्षीसपत्रांसाठी : एक टक्का
ग्रामीण भागात
खरेदी-विक्री व्यवहार : ३ टक्के
बक्षीसपत्रांसाठी : अर्धा टक्का
एक एप्रिलनंतर
खरेदी-विक्री व्यवहार : ५ टक्के
बक्षीसपत्रांसाठी : एक टक्का