दत्त साखर शिरोळ उभारणार ऑक्सिजन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:39+5:302021-05-12T04:25:39+5:30
शिरोळ : राज्यासह कोल्हापूर जिल्हा व कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ...

दत्त साखर शिरोळ उभारणार ऑक्सिजन प्लांट
शिरोळ : राज्यासह कोल्हापूर जिल्हा व कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. काही रुग्णांना अशावेळी ऑक्सिजनची तत्काळ गरज असते. मात्र, ऑक्सिजनअभावी बरेच रुग्ण अत्यवस्थ होत आहेत. ऑक्सिजन तुटवडा होऊ नये म्हणून श्री दत्त साखर कारखाना शिरोळ चार आठवड्यात ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करत असून दिवसाला १०० सिलिंडर ऑक्सिजन कार्यक्षेत्रातील रुग्णांना उपलब्ध होतील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी कोरोनाची राज्यातील गंभीर स्थिती आणि ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन साखर उद्योगातील कारखानदारांना ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लांट उभारण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. दत्त साखर कारखान्याने नाशिक येथील मे. साई नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी (एस.एन.सी.ई) या कंपनीस हा प्रकल्प उभारण्याचे काम दिले असून ताशी २५ मी. क्युबीक क्षमतेचा हा प्रकल्प असून लवकरच महिना अखेरीस प्रकल्प कार्यान्वित होऊन दररोज १०० सिलिंडर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कारखाना कार्यक्षेत्र तसेच शिरोळ तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिलासा देणारा ठरेल. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.
-----------------
-
कोट - तालुका आणि राज्यावर ज्या-ज्या वेळी संकटकालीन परिस्थिती उद्भवते, त्या-त्या वेळी दत्त कारखान्याने नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आपले योगदान दिले आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून आपली जबाबदारी म्हणून घरीच रहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
- गणपतराव पाटील, अध्यक्ष दत्त कारखाना शिरोळ
फोटो - ११०५२०२१-जेएवाय-०१-गणपतराव पाटील