शाहूकालीन परंपरा जपणारी दत्त महाराज तालीम शंभरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:27+5:302021-02-05T07:13:27+5:30
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या कृपाआशीर्वादाने कोल्हापुरात अनेक तालीम संस्थांचा उदय झाला. त्यापैकीच एक असलेल्या पापाची तिकटी परिसरातील दत्त ...

शाहूकालीन परंपरा जपणारी दत्त महाराज तालीम शंभरीत
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या कृपाआशीर्वादाने कोल्हापुरात अनेक तालीम संस्थांचा उदय झाला. त्यापैकीच एक असलेल्या पापाची तिकटी परिसरातील दत्त महाराज तालीम मंडळाने गुरुवारी शंभरी पार केली. तालमीतून अनेक दिग्गज मल्ल, राजकारणी घडले आहेत.
करवीर संस्थानात सरदार, पाटाकडील, तटाकडील, रंकाळावेश, गंगावेश, मोतीबाग अशा एक ना अनेक तालमीच सर्वसामान्यांना ज्ञात आहेत. मात्र, राजर्षींच्या शेवटच्या कार्यकालात १९२१ साली झालेल्या तालमीपैकी एक असलेल्या दत्त महाराज तालमीने गुरुवारी (दि. २८) शंभरी पार केली . पापाची तिकटीतील दत्त महाराज गल्लीतील बळवंतराव खुपेरकर यांनी स्वतःची जागा तालिमीसाठी दिली. तिथे पत्रावजा शेडमध्ये २८ जानेवारी १९२१ साली तालमीची उभारणी झाली. या कामात भैरवनाथ थोरावडे, ज्ञानदेव खूपेरकर, संतराम कातवरे, लक्ष्मण बावडेकर, केशव बावडेकर, रावजी बिडकर, भाऊसो बिडकर, गणपत साळोखे, बापुसो वडगावकर, ज्ञानू कातवरे, दत्तोबा वडगावकर, शिवराम कातवरे, कृष्णा कांडेकर, यशवंत बावडेकर, गोपाळ कातवरे, रामनाथ शिर्के, भिकोबा चव्हाण, बावजी चव्हाण, केरबा बावडेकर, के. डी. पेडणेकर यांचा सहभाग होता. स्वतःला आर्थिक चणचण जाणवत होती त्यावेळी दत्तोबा उत्तरेकर यांनी लाठीकाठी लेझीम आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्थेस आर्थिक मदत मिळवून दिली. काही वर्षांनी इथे दगडी एक मजली इमारत उभारली. हळूहळू तालमीचा पसारा वाढू लागला. परिसरातील अनेक नवयुवक तालमीत येऊ लागले. लेझीम, लाठीकाठी, फरीगदगा, दांडपट्टा खेळात प्रावीण्य मिळवलेल्या तालमीचा लौकीक वाढला.कुस्तीगीर म्हणून धोंडीराम खुपेरकर, हनुमंत कातवरे, शंकर थोरावडे, हरिभाऊ बावडेकर, टी. के. वडणगेकर, पांडुरंग कातवरे, बाबुराव बिडकर, वसंत कातवरे, बळी कुशिरेकर, गणपत वडगावकर, अण्णा पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात लौकिक मिळविला. इतकेच नाही तर तालमीच्या एकसंधपणामुळे बाबुराव उत्तरेकर, नारायण पठाडे आणि मारुती कातवरे अशा कार्यकर्त्यांना नगरपालिका व महापालिकेत महापौर नगराध्यक्षसारखी पदे भूषविली. मर्दानी खेळाची मोठी परंपरा असलेल्या तालमीच्या कार्यकर्त्यांनी प्रिन्सेस पद्माराजे यांच्या विवाहप्रसंगी जांबियाची प्रात्यक्षिके सादर करून विशेष बक्षिसे मिळविली होती. रामभाऊ थोरावडे, नारायण पठाडे यांनी तालमीचा विस्तार करून संस्थेत विविध स्पर्धा सुरू केल्या. तालमीच्या अमृत महोत्सवानिमित्त दगडी तालमीचे रुपांतर नव्या इमारतीत झाले. आजही हा वारसा आजची तरुण मंडळी नेटाने पुढे नेत आहेत. शंभरीनिमित्त तालमीतर्फे वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
फोटो : २८०१२०२१-कोल- दत्त महाराज तालीम ०१
आेळी: कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातील सध्याची दत्त महाराज तालीम मंडळाची नवी इमारत.