दर्शन शहा खून खटल्यातील चारु चांदणेचा १७ जूनला जबाब
By Admin | Updated: May 30, 2017 16:29 IST2017-05-30T16:29:19+5:302017-05-30T16:29:19+5:30
सुनावणीवेळी चारुसह तिघांचे मोबाईलचे कॉल डिटेल्स सादर

दर्शन शहा खून खटल्यातील चारु चांदणेचा १७ जूनला जबाब
चारुसह तिघांचे कॉल डिटेल्स सादर
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ३0 : देवकर पाणंद येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून खटल्यातील मुख्य संशयित आरोपी योगेश उर्फ चारु चांदणेचा जबाब १७ जून २०१७ ला होणार आहे. चारुसह तिघांचे मोबाईलचे कॉल डिटेल्स (सीडीआर) संबधित कंपनीचे नोडल आॅफिसर यांनी जिल्हा न्यायाधीश क्रमांक सहा एल.डी.बिले यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणीवेळी सादर केले. सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी या खटल्याचे काम पाहिले.
दर्शन शहा खून खटल्यात योगेश उर्फ चारु चांदणे हा मुख्य आरोपी आहे. या खून खटल्याची सुनावणी एल.डी.बिले यांच्या न्यायालयात दीड तासभर झाली. या सुनावणीवेळी चारु चांदणे, फिर्यादी स्मिता शहा व विश्वजीत बकरे यांचे कॉल डिटेल्सचे सीडीआर संबधित कंपनीचे नोडल आॅफिसर अमित रघुनाथ करकेरा (रा. मगरपट्टा सिटी, पुणे) यांनी सादर केले.
चारु चांदणेने आपल्या मोबाईलवरुन माजी नगरसेवक महेश गायकवाड याला घटनेपुर्वी एसएमएस केले आहेत. तसेच घटनेदिवशी कुंडीजवळील सापडलेली चिठ्ठीची माहिती मोबाईलवरुन विश्वजित बकरे यांनी स्मिता शहा यांना दिले,असे मोबाईल कॉल डिटेल्समध्ये दिसून आले आहे असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांनी केला. यावर बिले यांनी, चारु चांदणेचा जबाब १७ जून रोजी सुनावणीवेळी होईल, असे सांगितले. आरोपीच्यावतीने अॅड. पिटर बारदेस्कर यांनी काम पाहिले.