प्रत्येक जिल्ह्यात नृत्यालयाची स्थापना करणार-नृत्य परिषदेच्या विभागीय संमेलनात निर्णय : कार्यकारिणीची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:04+5:302021-01-18T04:21:04+5:30
कोल्हापूर : नृत्य परिषदेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नृत्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रथम विभागीय नृत्य संमेलनात ...

प्रत्येक जिल्ह्यात नृत्यालयाची स्थापना करणार-नृत्य परिषदेच्या विभागीय संमेलनात निर्णय : कार्यकारिणीची घोषणा
कोल्हापूर : नृत्य परिषदेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नृत्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रथम विभागीय नृत्य संमेलनात घेण्यात आला. या नृत्यालयात सादरीकरण, नृत्याचे अभ्यासक्रम, विविध प्रकारांचे नृत्य शिकवले जाणार असून, त्यासाठी दोन कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.
कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील नृत्य कलाकार नृत्य परिषदेअंतर्गत एकत्र आले असून, त्यांचे पहिले विभागीय संमेलन राम गणेश गडकरी हॉलमध्ये झाले. यावेळी नृत्य परिषदेच्या वेबसाइटचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते व डॉ. स्वागत तोडकर, डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या उपस्थितीत झाले.
या संमेलनात प्रत्येक जिल्ह्यात नृत्यालयाची स्थापना करून तेथे ऑडिटोरियम, ग्रंथालय, कार्यशाळांसाठी हॉल, नृत्याचे कार्यक्रम व सादरीकरणासाठी मोठे सभागृह उभारण्यात येईल. तसेच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, पाश्चात्य नृत्य या नृत्यप्रकारातील डिप्लोमा, डिग्री व करस्पॉन्डिंग कोर्स असे अभ्यासक्रम घेण्याचा निर्णय झाला.
अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी नृत्यालयाच्या स्थापनेसाठी, अभ्यासक्रमांसह निधीसाठी शासन पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. दीपक बिडकर यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. रोहित मंद्रुलकर यांनी पाश्चात्य नृत्य अभ्यासक्रमाची माहिती दिली. जतीन पांडे यांनी संघटन कौशल्य व उपक्रम विषद केले. दुपारच्या सत्रात भूपेश मेहेर, जतीन पांडे, डॉ. विनोद निकम यांची व्याख्याने झाली. परिसंवादात संतोष माने (सांगली) , राहुल कदम( सिंधुदुर्ग), अमित कदम (रत्नागिरी), महेश निकम्बे (सोलापूर) यांनी मनोगत व्यक्त केले.
पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख सागर बगाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
--
कार्यकारिणी अशी
विभाग सचिव : पंकज चव्हाण, विभागीय सहसचिव : महेश पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक आखाडे, सागर सारंग. पाश्चात्य अभ्यासक्रम समिती : रोहित मंदृलकर व प्रज्योत सोहनी.
--
फोटो नं १७०१२०२१-कोल-नृत्य परिषद
ओळ : कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये रविवारी नृत्य परिषदेच्या वतीने आयोजित पश्चिम महाराष्ट्र विभागीय संमेलनाचे उद्घाटन मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी सागर बगाडे, प्रवीण कोडोलीकर, डॉ. स्वागत तोडकर यांच्यासह नृत्यकर्मी उपस्थित होते.
--