महापुरामुळे सरुड परिसरातील ऊसपिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:37+5:302021-07-30T04:26:37+5:30
सरुड : वारणा व कडवी नदीच्या महापुरामुळे सरुड परिसरातील ऊसपिकासह भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून महापुराचा परिसरातील शेतकऱ्यांना ...

महापुरामुळे सरुड परिसरातील ऊसपिकांचे नुकसान
सरुड : वारणा व कडवी नदीच्या महापुरामुळे सरुड परिसरातील ऊसपिकासह भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून महापुराचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
अतिवृष्टीमुळे वारणा व कडवी या दोन्ही नद्यांना एका दिवसात महापूर आला. या महापुरामध्ये दोन्ही नदीकाठांवरील सरुड परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्रामधील पिके पुराच्या पाण्याखाली गेली होती. पावसाची संततधार तसेच वारणा व कडवी धरणांतून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पाच ते सहा दिवस नदीकाठाशेजारील पिके पाण्याखाली होती. जास्त काळ पिके पाण्याखाली राहिल्याने तसेच पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे अनेक ठिकाणची ऊसपिके कोलमडून भुईसपाट झाली आहेत; तर भातपिके पूर्णपणे कुजून वाया गेली आहेत.
वारणा व कडवी नदीकाठावरील सरुड परिसर हा ऊस पिकाचा पट्टा म्हणून ओळखला जातो; परंतु याच पट्ट्यात महापुराचा मोठा फटका बसल्याने या परिसरातील ऊसपिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
फोटो ओळी .
कडवी नदीच्या महापुरामुळे सरुड परिसरातील नदीकाठाशेजारील ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
( छाया : अनिल पाटील, सरुड)