तामजाई पठारावरील मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान

By Admin | Updated: April 12, 2015 23:57 IST2015-04-12T21:30:19+5:302015-04-12T23:57:54+5:30

५० ते ६० गावांना फटका : ऊस, मका, भुईमूग, गहू पिकांचे लाखोंचे नुकसान

Damage to crops by the ravishing animals on the Tajjai Plateau | तामजाई पठारावरील मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान

तामजाई पठारावरील मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान

प्रकाश पाटील- कोपार्डे -पन्हाळा, गगनबावड्याच्या सीमेवर असणाऱ्या विस्तीर्ण तामजाई पठारावरील मोकाट रानटी जनावरांनी कळे ते साळवण व कळे ते किसरूळ, काळजवडे दरम्यान ५० ते ६० गावांतील शेतातील पिके फस्त केल्याने लाखोंचे नुकसान होत आहे. या मोकाट रानटी जनावरांमध्ये गायी व बैल जास्त संख्येने आहेत. किमान ४०० ते ५०० जनावरांचा हा कळप आहे.
पठारावर ४०० ते ५०० गायी व बैल असा समावेश असलेला मोकाट जनावरांचा कळप आहे. सध्या या पठारावर पाणी व ओल्या चाऱ्याची कमतरता असल्याने या जनावरांनी अन्नाच्या शोधार्थ पठाराखालील शेतीकडे आपला मोर्चा वळविला आहे. हा कळप मध्यरात्री पठाराखाली उतरून मका, भुईमूग, गहू यासारखी पिके फस्त करून पुन्हा पठारावर पोबारा करीत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.कळेपासून साळवणपर्यंतची आसगाव, खेरिवडे, मुठकेश्वर, लोंघे, किरवे, त्याचबरोबर पन्हाळ्याच्या पश्चिमेकडील काटेभोगाव, पोहाळे, बाजारभोगाव, आदींसह लहान-मोठ्या वाड्यांतील शेतकरी या मोकाट रानटी जनावरांच्या त्रासाने त्रस्त आहेत. याबाबत वनविभागाकडूनही पळवाट शोधत ही जनावरे वन्य प्राण्यात येत नसल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.यासाठी काही गावांत ग्रामस्थांनी रात्री आपल्या गावच्या हद्दीत हा कळप येऊ नये म्हणून गस्ती पथके तयार करून स्वत:च संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर काही गावांनी आपल्या गावाकडे येणाऱ्या या कळपाच्या मार्गावर तारेचे कुंपण अथवा चरी मारून तो थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तरीही हा कळप कधी येतो आणि पिके फस्त करतो, याचा शेतकऱ्यांना अंदाजच येत नसल्याने लाखोंचे नुकसान होताना दिसत आहे.


वनविभागाकडून दुर्लक्ष-- या गायींचे वनगाईमध्ये वर्गीकरण होत नाही. तामजाई पठारावर वनगाई असल्याची नोंदही वनविभागाकडे नाही. त्यामुळे हा जनावरांचा कळप मोकाट असल्याचे वनखात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही गवा अथवा इतर वन्य प्राण्यांवर कारवाई करू शकत नाही, असे वनविभागाकडून शेतकऱ्यांना सांगितले जाते.


कितीही शेताची राखण केली, तरी पिकांचे संरक्षण करणे अवघड झाले आहे. हा कळपच मोठा असल्याने हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. मग डबे वाजवून, मशाली पेटवून, फटाके वाजवून पिकांच्या संरक्षणाचा प्रयत्न सुरू आहे.
- गणपती मोळे, शेतकरी,
खेरिवडे, ता. पन्हाळा.


उसातील आंतरपीक मक्यावर या मोकाट जनावरांचा डोळा असतो. यावर्षी आम्ही उसात मकाच घातलेला नाही. मका नाही तरी पण उसाचा फडशा पाडला जातोय. गावकऱ्यांनी तारेचे कुंपण कळपाच्या मार्गावर मारले आहे. चरी मारल्या आहेत. तरीदेखील या जनावरांचा बंदोबस्त करणे कठीण झाले आहे.
- सुरेश मोळे, शेतकरी,
लोंघे, ता. गगनबावडा.

$$्रिजनावरे आक्रमक
तामजाई पठारावर असणाऱ्या धनगर लोकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी शहराचा आसरा घेतला आहे. त्यांनी त्यावेळी आपल्याकडील जनावरे येथेच सोडून दिली. आता ही संख्या वाढत जाऊन तो ४०० ते ५०० जनावरांचा कळप झाला आहे. यातील गायी थोड्या भित्र्या असल्या, तरी बैल अत्यंत आक्रमक असतात. कळपाजवळ जाण्याचे धाडस होत नाही, असे येथील शेतकरी सांगतात.

Web Title: Damage to crops by the ravishing animals on the Tajjai Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.