गगनबावडा, धामणी धरण ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी प्रवास करण्याचा धरणग्रस्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:14+5:302020-12-15T04:41:14+5:30
गगनबावडा, पन्हाळा व राधानगरी या तीन तालुक्यांतील ४० गावांचा समावेश असलेल्या धुंदवडे व धामणी खोऱ्यात हरितक्रांती घडविणाऱ्या राई ...

गगनबावडा, धामणी धरण ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी प्रवास करण्याचा धरणग्रस्तांचा इशारा
गगनबावडा, पन्हाळा व राधानगरी या तीन तालुक्यांतील ४० गावांचा समावेश असलेल्या धुंदवडे व धामणी खोऱ्यात हरितक्रांती घडविणाऱ्या राई येथील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास १६ नोव्हेंबर २००० रोजी सुरुवात केली. निधीअभावी प्रकल्प अर्ध्यावरच रखडला आहे. या-ना-त्या कारणाने धरणग्रस्तांनाही वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.२१ वर्षे मागे पडली तरी येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिलेल्या नाहीत. दोन वर्षांपासून गट नं.९९ मध्ये वसाहत क्र.१ तसेच गट नं.८३ मध्ये वसाहत क्र.२ मध्ये नवीन वसाहती विस्थापनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, येथे रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या पायाभूत सुविधांची वानवा आहे. याबाबत प्रशासनास वारंवार लेखी, तोंडी निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी यांना साकडे घातले, पण आजअखेर आश्वासनापलीकडे काहीही पदरात पडले नाही. २१ वर्षांपासून येथील जनतेला रानटी जीवन जगावे लागते. आमच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा २१ डिसेंबर रोजी आमच्या राई गावापासून थेट जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही धरणग्रस्त पायी चालण्याचा आंदोलनाचा वेगळा मार्ग अवलंबणार आहे. श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष गुंडोपंत जिनगरे, उपाध्यक्ष देऊ पाटील, कृष्णा जिनगरे, संजय शिंदे, धोंडीबा गुरव, युवराज गुरव अशा दहा पदाधिकारी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. यासंबंधीचे निवेदन उपविभागीय अधिकारी राधानगरी, कार्यकारी अभियंता कोल्हापूर, आमदार प्रकाश आबिटकर, तहसीलदार राधानगरी, पोलीस निरीक्षक राधानगरी यांना दिले आहे.