धरणग्रस्तांनी उचंगी धरणाचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:55+5:302020-12-07T04:17:55+5:30
धरणस्थळावर जे.सी.बी., डंपर तैनात आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचे सुरू केलेले काम धरणग्रस्तांनी मोर्चाने जाऊन बंद पाडले. ‘आधी ...

धरणग्रस्तांनी उचंगी धरणाचे काम पाडले बंद
धरणस्थळावर जे.सी.बी., डंपर तैनात
आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचे सुरू केलेले काम धरणग्रस्तांनी मोर्चाने जाऊन बंद पाडले. ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’असे धरणग्रस्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले. धरणस्थळावरील रस्त्यांची साफसफाई व घळभरणीच्या कामांना सुरुवात केली होती.
धरणग्रस्तांनी प्रकल्पाचे काम बंद पाडल्यानंतर चाफवडे येथील विठ्ठल मंदिरात पाटबंधारेचे अधिकारी व धरणग्रस्तांची बैठक झाली. उचंगी प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. घळभरणीचे काम शिल्लक आहे. मात्र, धरणग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. धरणग्रस्त वसाहतीमध्ये अद्यापही सुविधा उपलब्ध नाहीत. संकलन दुरुस्ती, भूखंड वाटप, पॅकेजचे पैसे वाटप, पर्यायी जमीन वाटप या विषयांवर धरणग्रस्तांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी उचंगी धरणाच्या तारओहोळ ओढ्यातील विहिरीचे काम सुरू करण्यासाठी जेसीबी व डंपर प्रकल्पस्थळावर आणून परिसराच्या स्वच्छतेला सुरुवात केली होती.
विठ्ठल मंदिरातील चर्चेत धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली. कार्यकारी अभियंता अमोल नाईक, उपविभागीय अभियंता अनिल कोरगावकर, विजयसिंह राठोड, कनिष्ठ अभियंता सुशील पाटील, धरणग्रस्तांचे नेते संजय तर्डेकर, निवृत्ती बापट, संजय गावडे, संजय भडांगे, शंकर लांडे, रघुनाथ धडाम, आप्पा मणकेकर, चंद्रकांत ठाकर, प्रकाश मस्कर, विठोबा सुपल, आप्पा धडाम व धरणग्रस्त उपस्थित होते.
------------------------
* आंबेओहोळपाठोपाठ उचंगीचेही काम बंद
आंबेओहोळ धरणग्रस्तांनी दोन दिवसांपूर्वी पुनर्वसनाच्या प्रश्नांसाठी धरणाचे काम बंद पाडले. त्यापाठोपाठ धरणग्रस्तांनी उचंगीचेही काम मोर्चाने जाऊन बंद पाडले. पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
------------------------
* उचंगी प्रकल्पस्थळावर तात्पुरते कार्यालय होणार
धरणग्रस्तांच्या अडचणींसाठी यापुढे आजरा, गारगोटी, गडहिंग्लज येथे जावे लागते. त्यामुळे धरणग्रस्तांचा वेळ, पैसा व श्रम वाया जातात. ते होऊ नये यासाठी प्रकल्पस्थळावर तात्पुरते कार्यालय सुरू करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत.