तमदलगे येथे अपघातात वळीवडेचे पिता-पुत्र ठार

By Admin | Updated: April 4, 2016 01:10 IST2016-04-04T01:10:16+5:302016-04-04T01:10:32+5:30

रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास अपघात

Dalwale police killed father and son in the accident | तमदलगे येथे अपघातात वळीवडेचे पिता-पुत्र ठार

तमदलगे येथे अपघातात वळीवडेचे पिता-पुत्र ठार

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावर तमदलगे (ता. शिरोळ) येथे मोटारसायकल व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील पिता-पुत्र जागीच ठार झाले. विजय जयवंत माने (वय ३५) व शमुवेल विजय माने (९, दोघे रा. मेघराज कॉलनी, वळीवडे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. दानोळी येथे नातेवाइकांकडे माने पिता-पुत्र आले होते. गावी परतताना हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, विजय माने व शमुवेल माने हे मोटारसायकलवरून गांधीनगर-वळीवडेकडे निघाले होते, तर ट्रक कोल्हापूरहून जयसिंगपूरच्या दिशेने येत होता. तमदलगे येथे ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात माने पिता-पुत्र जागीच ठार झाले. या अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच जयसिंगपूरचे पोलिस उपनिरीक्षक सत्यराज घुले, प्रकाश घोडके, हवालदार गजानन कोष्टी यासह कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दानोळी येथे नातेवाइकांकडे माने पिता-पुत्र हे दोघेजण आले होते. दरम्यान, गावाकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. विजय माने यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: Dalwale police killed father and son in the accident