दूध संस्था, उत्पादकांनी म्हैस दुधाचे उत्पादन वाढवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:17+5:302021-07-04T04:17:17+5:30
आजरा : ‘गोकुळ’ने २० लाख लिटरचे लक्ष ठेवले असून मुंबईच्या बाजारपेठेत म्हशीच्या दुधाला मागणी आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील ...

दूध संस्था, उत्पादकांनी म्हैस दुधाचे उत्पादन वाढवावे
आजरा : ‘गोकुळ’ने २० लाख लिटरचे लक्ष ठेवले असून मुंबईच्या बाजारपेठेत म्हशीच्या दुधाला मागणी आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील दूध संस्था व उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर यांनी केले. तालुक्यातील प्रत्येक दूध संस्था व दूध उत्पादकांची भेट घेऊन दूध उत्पादन वाढविण्यासाठी श्रीमती रेडेकर यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यावेळी रेडेकर बोलत होत्या.
योग्य आर्थिक नियोजन व काटकसरीचा कारभार करून दुधाला दोन रुपये जास्त देण्यासाठी प्रयत्नशील आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा बँकेच्या सहकार्यातून दूध उत्पादकांना बिनव्याजी कर्जप्रकरण करणार असल्याचेही रेडेकर यांनी सांगितले. दूध संस्थांना दैनंदिन येणाऱ्या अडचणी यावेळी त्यांनी जाणून घेतल्या; तसेच त्यांच्या सोडवणुकीसाठी संबंधित विभागांना तातडीने आदेश दिले. यावेळी संस्थांनी ‘गोकुळ’च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अंजना रेडेकर यांचा सत्कार केला. यावेळी किरण पाटील, सहायक व्यवस्थापक रवींद्र करंबळी, पर्यवेक्षक महेश कोल्हे, विश्वास चव्हाण, दशरथ होलम, विजय केसरकर, बाबूराव धुमाळे, दयानंद जाधव, सुधीर पाटील, विनायक पाटील, विजय पवार यांसह संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन - पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील दूध संस्थांच्या वतीने ‘गोकुळ’च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अंजना रेडेकर यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
०३ अंजना रेडेकर सत्कार