दिवसाआड पाणीपुरवठा आॅगस्टपर्यंत कायम

By Admin | Updated: July 3, 2016 00:48 IST2016-07-03T00:48:00+5:302016-07-03T00:48:00+5:30

महापालिकेचे यशस्वी नियोजन : तीन महिन्यांत एकही तक्रार नाही

Daily water supply continued till August | दिवसाआड पाणीपुरवठा आॅगस्टपर्यंत कायम

दिवसाआड पाणीपुरवठा आॅगस्टपर्यंत कायम

कोल्हापूर : यंदा राधानगरी धरणातील संपलेले पाणी आणि भविष्यात साठणारे पाणी यांचा विचार करता महापालिकेने कोल्हापूर शहरासाठी ‘एक दिवसाआड’पाणी पुरवठा आॅगस्टपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या तीन महिन्यांतील या नियोजनाचा अनुभव चांगला आहे. शहरात पाणीपुरवठा सुरळीत राहिला. त्याबद्दल कोणतीही तक्रार आलेली नाही; त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला आहे.
टंचाईच्या काळातही प्रशासनाने समयसूचकतेने योग्य नियोजन केल्यामुळे एप्रिलपासून आजपर्यंत रोज किमान सुमारे ४० एमएलडी पाणीबचत करण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश आले.
गेल्यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम धरणे उशिरा व कमी भरण्यामध्ये झाला. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. एकेकाळी शहराला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव यंदा पूर्णपणे प्रथमच आटला. त्यामुळे तलावातील गाळ उपसा करून पाण्याची खोली जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न झाला. दुष्काळाची झळ कोल्हापूर शहरालाही प्रथमच बसली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. पुढे राधानगरी धरणाने तळ गाठलाच; त्यामुळे १ जूननंतर तुळशी धरणाचा आधार महापालिकेला प्रथमच घ्यावा लागला; पण भविष्यात उद्भवणारी परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने तशी पाणीटंचाईची झळ शहराला बसली नाही. दिवसाआड पाण्याचे नियोजन शहरवासीयांनीही अंगीकृत केले. त्यातून तक्रार उद्भवली नाही. दिवसाआड नियोजनामध्ये प्रतिदिनी किमान ८० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा पुरेसा असल्याने हेच ‘दिवसाआड’ पाण्याचे नियोजन आॅगस्टअखेर ठेवून त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
रोज ८० एमएलडी उपसा : आतापर्र्यंत ४० एमएलडी पाण्याची बचत
शहराला रोज पाणीपुरवठा सुरू असताना शिंगणापूर आणि बालिंगा येथील उपसा पंपांतून सुमारे १२० एमएलडी पाणीउपसा रोज करण्यात येत होता; पण दिवसाआड नियोजनानंतर रोज सुमारे ८० एमएलडी पाणीउपसा होऊन सुमारे ४० एमएलडी पाण्याची बचत होत गेली.
पाण्यासाठी आंदोलने गायब
गेल्या तीन वर्षांत पाण्यासाठी अवघी तीनच आंदोलने झाली. बापट कॅम्प, कसबा बावडा आणि मोरेवाडीनजीक अशा तीनच ठिकाणी पाण्यासाठी रास्ता रोको झाले. याशिवाय आॅनलाईन तक्रारीमध्ये कसबा बावडा येथील एका महिलेने तिसऱ्या मजल्यावर पाणी चढण्याइतके जादा दाबाने पाणी येत नसल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी केली होती. याशिवाय पाण्यासाठीची आंदोलने लुप्त झाली आहेत.
गेल्या तीन महिन्यांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना पाणीपुरवठ्याबाबत एकही तक्रार आलेली नाही. याचाच अर्थ सुमारे ८० एमएलडी पाणी शहरासाठी पुरेसे आहे. पाणीपुरवठा विभागाचे योग्य नियोजन व लोकांचे सहकार्य यामुळे टंचाई स्थितीतही पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य झाले.
- मनिष पवार, जलअभियंता, महापालिका कोल्हापूर.
एक दिवसाआड पुरवठ्यामुळे पाणी पुरवून वापरण्याची सवय लागली. ही व्यवस्था कायम चालू ठेवावी. पाणी बचतीचा हा चांगला मार्ग आहे. राज्यात अनेक शहरांत आठ दिवसांतून एकदा पाणी येते. आपण कोल्हापूरकर त्या तुलनेत भाग्यवान आहोत. पुरेसे पाणी मिळत असल्याने व्यवस्था बदलण्याची गरज नाही.
- किरण भोसले, निवृत्त उपसंचालक, अल्पबचत.

Web Title: Daily water supply continued till August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.