शववाहिका चालकांचा रोजचा प्रवास मृत्यूसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST2021-04-25T04:22:49+5:302021-04-25T04:22:49+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची जोखीम पत्करून काेरोनाग्रस्त मृतदेहांची रुग्णालय ते स्मशानघाटापर्यंतची ने-आण करण्याची सेवा महापालिकेच्या अग्निशमन दलातील १८ ...

शववाहिका चालकांचा रोजचा प्रवास मृत्यूसोबत
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची जोखीम पत्करून काेरोनाग्रस्त मृतदेहांची रुग्णालय ते स्मशानघाटापर्यंतची ने-आण करण्याची सेवा महापालिकेच्या अग्निशमन दलातील १८ चालक अहोरात्र करीत आहेत. अनेकदा कोरोनाने मृत झालेल्या नागरिकांचे प्लास्टिक रॅपिंग व रुग्णालयीन प्रक्रिया होण्याअगोदरच नातेवाईक शववाहिकेसाठी आग्रह करतात. अशावेळी दोन-दोन तास चालकाला पीपीई कीट घालून उन्हाच्या तडाख्यातही तिष्ठत उभे राहावे लागते. यात चालकाला अनेकदा उष्णतेचा त्रास होतो; पण तरीही कुरकुर न करता ही सेवा चालक देत आहेत.
महापालिकेने शहराअंतर्गत एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या घर ते स्मशानघाटापर्यंत मोफत नेण्याची सोय आहे. या सेवेअंतर्गत रोज किमान वीसजणांचे मृतदेह पंचगंगा, बापट कॅम्प, कसबा बावडा येथील स्मशानघाटापर्यंत नेले जातात. त्याकरिता लक्ष्मीपुरी, ताराराणी चौक, महापालिका, शास्त्रीनगर, फुलेवाडी, टिंबर मार्केट, कसबा बावडा येथील फायर स्टेशनमध्ये प्रत्येकी एक किंवा दोन या पद्धतीने सात शववाहिका आहेत. या शववाहिकेवर नियमित चालक आहेत. तरीसुद्धा कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अग्निशमन दलातर्फे फायर फायटरवरीलही चालकांना प्रत्येकी चार दिवसांनी एक दिवस अशा प्रमाणे कोरोना मृतदेह घर ते स्मशानघाटापर्यंत नेण्याची ड्युटी दिली आहे. रोज किमान नऊ कोरोना मृतदेह वाहून नेले जातात. मृतदेह पोहोचवून चालक स्टेशनला आल्यानंतर त्या चालकाला सॅनिटायझेशननंतर शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन व अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. अशावेळी अन्य कर्मचारी ग्लुकोज व ओआरएस देऊन पुन्हा चालकांना ताजेतवाने करतात. अनेकदा चालकांना कोरोना मृतदेह वाहून नेल्यानंतर मानसिक ताण येतो. त्यामुळे अग्निशमन दलाने नियमित शववाहिका चालकांसह दलातील फायर फायटरवरील चालकांनाही चार दिवसांतून एकदा ही ड्युटी बंधनकारक केली आहे. त्यामुळे काही अंशी चालकांना दिलासा मिळाला आहे.
चौकट
एकूण शववाहिका - ७
त्यापैकी कार्यरत - ५
कोविडसाठी - २
नाॅन कोविडसाठी - ३
राखीव शववाहिका - २
चालक संख्या - १८
सरासरी रोज १७ मृतदेहांची ने-आण
कोविड - ९
नाॅनकोविड - ८
चालकांना या समस्या
शववाहिकेवर काम करणाऱ्या चालकांना पीपीई कीट घालून कोरोनासह नियमित शववहन करावे लागते. त्यामुळे डिहायड्रेशन, मळमळणे, अशक्तपणा येणे अशा समस्येला सामोरे जावे लागत आहे.
कोट
कोरोना मृतदेह स्मशानघाटापर्यंत नेण्यासाठी रुग्णालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शववाहिकेसाठी नागरिकांनी फोन करावा. जेणेकरून चालकांनाही रुग्णालयाच्या दारात ताटकळत राहावे लागणार नाही. त्यानंतर पुढील वर्दीकरिता तत्काळ जाणे सोईचे होईल. योग्य ती कोरोनासंबंधी सुरक्षा नियम पाळून ही सेवा २४ तास अग्निशमन दल पुरवीत आहे.
रणजित चिले,
मुख्य अग्निशमन अधिकारी, कोल्हापूर