कोल्हापूर : वाडी-रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरावर गुलाल खोबऱ्याची उधळण आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गरज करून परतलेल्या आणि भक्तीच्या गुलालाने रंगलेल्या भाविकांनी रविवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. जोतिबा यात्रेला आठ दिवस झाले असले तरी पाकाळणीपर्यंत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिरासह महाद्वार रोड परिसर भाविकांनी फुलला होता.श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा मागील शनिवारी (दि.१२) पार पडली मुख्य यात्रा एक दिवसाची असली तरी त्यानंतर पाकाळणीपर्यंत येथे यात्रेचा उत्साह असतो. त्यात रविवार जोतिबाचा वार असल्यानेही डोंगरावर मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर आपसूकच भाविकांची पावले कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराकडे वळत आहेत.एरवीदेखील शनिवार रविवारी सुट्ट्यांमुळे अंबाबाईला गर्दी असतेच पण जोतिबा यात्रेकरूंमुळे ही गर्दी वाढली आहे. अंबाबाई दर्शनानंतर भाविक महाद्वार रोडवर खरेदीचा आनंद घेत आहे. त्यामुळे मंदिर, बाह्य परिसर तसेच पार्किंग याठिकाणी गुलालाने रंगलेले भाविक दिसत होते.
जोतिबा डोंगरावर पाकळणी यात्राजोतिबा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे जोतिबाच्या दर्शनासाठी रविवारी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ‘चांगभलं’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि ढोल-ताशांचा निनाद अशा वातावरणात यात्रा पार पडली. या रविवारी सुद्धा जोतिबा मंदिरात मोठ्या संख्येने सासनकाठ्या आल्या होत्या.जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी झाली. चैत्र यात्रेनंतर येणारा हा दुसरा रविवार असल्याने भाविकांनी डोंगरावर गर्दी केली होती. ज्या भाविकांना चैत्र यात्रेला यायला जमले नव्हते त्या भाविकांनी रविवारी श्री जोतिबाचे आपल्या सासनकाठीसहित दर्शन घेतले. शनिवारी रात्रीपासूनच भाविक मोठ्या संख्येने जोतिबा डोंगरावर दाखल होत होते. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दक्षिण दरवाजा परिसरापर्यंत दर्शन रांग लागली होती.काल रविवारी पहाटे ४ वाजता घंटानाद होऊन मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. यानंतर मंदिरातील नित्य धार्मिक विधी पार पडले. सकाळी ८ वाजता श्रींना अभिषेक करण्यात आला. यानंतर श्री जोतिबाची सरदारी स्वरूपातील खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. सकाळी ११ वाजता धुपारती सोहळा झाला. रात्री ८:३० वाजता पालखी सोहळ्याला सुरवात झाली.