गतवर्षी बांधलेल्या रस्त्याला भेगा, पन्हाळा नागरीकांवर पुन्हा संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 18:59 IST2021-07-30T18:55:54+5:302021-07-30T18:59:23+5:30
Flood Fort Panhala Kolhapur pwd : अतिवृष्टीने आणि भुस्खलनाने २३ जुलै रोजी पन्हाळ्यावरील जुन्या नाक्याजवळील रस्ता खचला असतानाच पन्हाळकरांवर आणखी नवे संकट आले आहे. गतवर्षी २०१९ मध्ये रस्ता खचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने बांधलेल्या रस्त्याला शुक्रवारी मोठ्या भेगा पडल्या आहेत.

पन्हाळा येथील २०१९ मध्ये सावर्जनिक बांधकाम विभागाने नव्याने केलेल्या रस्त्याला शुक्रवारी पुन्हा तडे गेले. (छाया : नितीन भगवान)
पन्हाळा : अतिवृष्टीने आणि भुस्खलनाने २३ जुलै रोजी पन्हाळ्यावरील जुन्या नाक्याजवळील रस्ता खचला असतानाच पन्हाळकरांवर आणखी नवे संकट आले आहे. गतवर्षी २०१९ मध्ये रस्ता खचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने बांधलेल्या रस्त्याला शुक्रवारी मोठ्या भेगा पडल्या आहेत.
अतिवृष्टीने २०१९ मध्ये पन्हाळा-बुधवारपेठ हा नऊशे मीटर रस्ता खचला होता. सार्वजनीक बांधकाम विभागाकडुन हे काम सुमारे नऊ महिने चालु होते, तोपर्यंत पन्हाळा आणि येथील पर्यटन बंद राहिले होते. आता पुन्हा हा नव्याने बांधलेल्या रस्त्याचा पुढील भाग अतिवृष्टीने आणि भुस्खलनाने खचल्याने पन्हाळ्यातील सर्वच व्यव्हार ठप्प झाले आहेत.
दरम्यान, जुन्या नाक्याजवळ खचलेल्या रस्त्याच्या कडेने जा-ये करण्यासाठी लोकांना परवानगी दिली होती, पण त्यापुढील रस्त्याला आता भेगा पडु लागल्याने हा चालत जाण्याचा मार्गपण बंद झाला आहे. यामुळे सध्या सर्व पन्हाळकर भयभित झाले आहेत. त्यातच पावसाचेही प्रमाण वाढले आहे. पाण्याचे लोट त्या रस्त्यावरुन वहात आहेत, अजुन कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागणार हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावतो आहे.
डांबरी रस्त्याचे खालील भागातील मातीचा भराव खाली दबल्याने डांबरी रस्त्याला तडे जावु शकतात. या बाबत सध्या अधिक कांही सांगु शकत नाही.
-अमोल कोळी,
शाखा अभियंता, सार्वजनीक बांधकाम विभाग.