बचत गटांची कोटीची उलाढाल

By Admin | Updated: January 15, 2015 00:12 IST2015-01-15T00:01:55+5:302015-01-15T00:12:20+5:30

राज्यस्तरीय प्रदर्शन : तीन दिवसांनंतर गर्दीने झाली सांगता; १०५ गटांचे स्टॉल

Crores turnover of savings groups | बचत गटांची कोटीची उलाढाल

बचत गटांची कोटीची उलाढाल

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आवारात गेले तीन दिवस सुरू असलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनाची आज, बुधवारी गर्दीनेच सांगता झाली. या प्रदर्शनात तब्बल १०५ बचत गटांचे स्टॉल सहभागी झाले होते. तीन दिवसांत प्रदर्शनात तब्बल एक कोटीची उलाढाल झाली. या प्रदर्शनात विविध जिल्ह्यांतील बचत गटांनी बनविलेल्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. शेळेवाडी (ता. करवीर) येथील बचत गटाने महिला दूध संकलन सुरू केले असून, सभासदांना सहा टक्के लाभांश देऊन इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. सामुदायिक शेती, तसेच कृषी विभागाकडून ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर अवजारांसह मिळाले आहेत. या बचत गटाचे ‘नाबार्ड’च्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले. बेलवळे (ता. कागल) येथील भावेश्वरी बचत गटाच्या वतीने रेशन दुकान, रॉकेल डेपो, खत विक्री, बी-बियाण्यासह कीटकनाशकांची विक्री केली जाते. अशी विक्री करणारा राज्यातील हा एकमेव बचत गट असल्याचे गौरवोद्गार अधिकाऱ्यांनी काढले. प्रदर्शनात सावंतवाडीची लाकडी खेळणी, रत्नागिरीचे काजू, सांगोल्याची घोंगडी, नाशिकची पैठणी, आजऱ्याचा घनसाळ, कोल्हापुरी चप्पल या उत्पादनांनी विशेष गर्दी खेचली. आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने ग्राहकांनी तुडुंब गर्दी केली होती. प्रदर्शनाला रायगड जिल्हा बॅँकेच्या अधिकारी प्रा. अंजली पाटील, भरत दैनी, प्रवीण सूर्यवंशी, एम. डी. पाटील, डॉ. एम. व्ही. कुलकर्णी, आदींनी भेट दिली. तीन दिवस चाललेल्या प्रदर्शनात एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. सहभागी बचत गटांना जिल्हा बॅँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.


गीता पाटील यांनी चालविला ट्रॅक्टर
शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील बचत गटाच्या अध्यक्ष गीता पाटील यांनी ट्रॅक्टर अवजारासह चालवून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. महिलाही काही कमी नसल्याचे त्यांनी दाखवून दिल्याने उपस्थितांनी बचत गटांचे कौतुक केले.

Web Title: Crores turnover of savings groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.