पिके गेली कुजून, राहिल्या फक्त काड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:26+5:302021-07-31T04:24:26+5:30

पुराचे पाणी जलद गतीने वाढले, पण ओसरताना मात्र संथ गती राहिली. त्यामुळे पिकांवर पाण्याच्या वस्त्या वाढल्या. त्याचा मोठा परिणाम ...

Crops are gone, only sticks are left | पिके गेली कुजून, राहिल्या फक्त काड्या

पिके गेली कुजून, राहिल्या फक्त काड्या

पुराचे पाणी जलद गतीने वाढले, पण ओसरताना मात्र संथ गती राहिली. त्यामुळे पिकांवर पाण्याच्या वस्त्या वाढल्या. त्याचा मोठा परिणाम सर्वच पिकावर झाल्याने ती सडून गेली आहेत. पुराचे पाणी ओसरू लागल्यावर कधी एकदा आपले शेत आणि पीक बघू अशा आशेने गेलेल्या शेतकऱ्यांची पीक बघून घोर निराशा झाली आहे.

सोयाबीनच्या इतिहासात पहिल्यांदा क्विंटलला दहा हजारच्या जवळपास दर गेला, पण पूर पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या नशिबात सोयाबीनचा एक दाणाही शिल्लक राहिला नाही याचा मोठा फटका कवठेसार येथील शेतकऱ्यांना बसला आहे, तर दानोळी, कोथळी गावात फ्लॉवर, कोबीज, टोमॅटो, झेंडू अशी भाजीपाला व फुलझाडांच्या शेतात केवळ खुंट शिल्लक राहिले आहेत.

ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले असून, नुकत्याच केलेल्या आडसाली लावणी, रोपे कुजून गेली आहेत. तसेच थोड्याच दिवसांत मोठ्या उसाची शेंडे गळून पडू लागणार व डोळे फुटून कोंब येण्यास सुरुवात होऊन ऊस पोकळ होण्यास सुरुवात होणार असा अनेकदा आलेल्या पुराचा अनुभव आहे.

अगोदरच २०१९ च्या महापुरात आर्थिक अडचणीतून सावरला नसताना आणखी एकदा महापूर आल्याने पुढचं आर्थिक नियोजन कसं करायचं असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तसेच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून, त्यात महापुरामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

चौकट..

प्रामाणिक शेतकरी वंचितच

२०१९च्या पूरकाळात प्रामाणिकपणे पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचे जाहीर करून दोन वर्षे उलटत आले, पण अद्याप शेतकऱ्यांना ते मिळालेले नाही. यंदा महापुरामुुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

फोटो : महापुरामुळे सोयाबीन पिकाच्या अशा फक्त काड्या शिल्लक राहिल्या आहेत.

छाया : भालचंद्र नांद्रेकर, दानोळी

Web Title: Crops are gone, only sticks are left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.