मुरलीधर जाधवच्या घरामध्ये क्रिकेट बेटिंग
By Admin | Updated: January 25, 2015 01:08 IST2015-01-25T01:02:02+5:302015-01-25T01:08:29+5:30
दोघांना अटक

मुरलीधर जाधवच्या घरामध्ये क्रिकेट बेटिंग
कोल्हापूर : महापालिकेचे विरोधी पक्षनेते व नगरसेवक मुरलीधर पांडुरंग जाधव यांच्या टाकाळा येथील फ्लॅटमध्ये क्रिकेट
बेटिंग घेणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी काल, शुक्रवारी छापा टाकून अटक केली.
प्रकाश श्रीचंद जग्याशी (वय ४० ), लक्ष्मण सफरमल कटयार (२७, दोघे राहणार प्रेमप्रकाश मंदिरजवळ, गांधीनगर, ता. करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून लॅपटॉप, एलईडी, मोबाईल, प्रिंटर, वॉकमन, मोटारसायकल असा सुमारे एक लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.नगरसेवक मुरलीधर जाधव (रा. राजारामपुरी दहावी गल्ली, कोल्हापूर) यांचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, टाकाळा परिसरात जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये संशयित मुरलीधर जाधव याचा ४०२ क्रमांकाचा फ्लॅट आहे. काल, शुक्रवारी या फ्लॅटमध्ये संशयित प्रकाश जग्याशी व लक्ष्मण कटयार हे दोघे दुपारी आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्याचे लॅपटॉप व मोबाईलद्वारे बेटिंग घेत होते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोेलिसांनी छापा टाकला. त्यावेळी जग्याशी व कटयार हे दोघे बेटिंग घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांनाही पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यानुसार जग्याशीसह जाधववर मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ अनुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद पोलीस निरीक्षक अमृत व्ही. देशमुख यांनी दिली. आज अटक केलेल्या प्रकाश जग्याशी व लक्ष्मण कटयार या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना न्यायालयाने त्यांना जामीन दिला. याची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली आहे.
मुरलीधर जाधव पसार...
टाकाळा येथील या अपार्टमेंटमध्ये छापा टाकल्यानंतर संशयित मुरलीधर जाधव हा पोलिसांना बघून या अपार्टमेंटमधील दुसऱ्या जिन्यावरून पसार झाला. काल, शुक्रवारी पोलिसांकडून दिवसभर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अमृत व्ही. देशमुख यांनी सांगितले.
४० मोबाईल जप्त...
क्रिकेट बेटिंग प्रकरणात पोलिसांना विविध कंपन्यांचे मोबाईल मिळून आले आहेत. या मोबाईलवर आलेले व गेलेले कॉल याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर याचा सखोल तपास करणार असून त्याची पाळेमुळे शोधून काढणार असल्याचे तपास अधिकारी देशमुख यांनी सांगितले.