चळवळीसाठी हवा प्रत्येकाचा हातभार
By Admin | Updated: August 17, 2014 22:32 IST2014-08-17T21:36:28+5:302014-08-17T22:32:27+5:30
हौतात्म्याला एक वर्ष...

चळवळीसाठी हवा प्रत्येकाचा हातभार
जगदीश कोष्टी - सातारा -- अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. ती नष्ट करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या संघटनेच्या माध्यमातून आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. ही चळवळ अशीच पुढे नेण्यासाठी नव्या पिढीला बाळकडू देण्याची गरज आहे, असा सूर विविध बँकांमधील अधिकाऱ्यांमधून उमटू लागला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी चालविलेली अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ केवळ सातारा जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नसून ती राज्याच्या कानाकोपऱ्या पोहोचली आहे. सातारा शहरात विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे काम चालते. याठिकाणी कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समाजात थेट संपर्क येत नसला तरी हा घटक या चळवळीकडे संवेदनशील नजरेतून पाहत आहे.
चळवळ पुढे नेण्यासाठी दाभोलकरांएवढाच त्यांच्या मुलांनी हा वारसा जपला आहे. दाभोलकरांना आपल्यातून जाऊन एक वर्ष होत नाही, तोच त्यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर व दाभोलकर कुटुंबीयांनी आपले घर ‘तारांगण’ हे कार्यकर्ते घडविण्यासाठी समितीला दिले आहे. याठिकाणी कार्यकर्ता घडविण्याच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे काम केवळ दाभोलकर कुटुंबीयांचे नसून प्रत्येकाचे आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही मत व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांनी मांडले परखड मत
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ वाढवायची असेल तर भावी पिढीत ती रुजवणे गरजेचे आहे. पाठ्यपुस्तकात थोरांचे धडे असतात. त्याप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची माहिती देणारा धडा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करणे गरजेचे आहे. वयस्क व्यक्तींपेक्षा बालकांवर योग्य संस्कार केल्यास ते अधिक परिणामकारक ठरू शकते.
- बाळकृष्ण खाडे
समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. श्रद्धा-अंधश्रद्धा याविषयी दाभोलकरांचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. त्यांनी कधीही धर्माला, रूढी-परंपरांना विरोध केला नाही. आपल्या श्रद्धेमुळे समाजाला बाधा पोहोचणार नाही, यादृष्टीने प्रत्येकानेच वागायला हवे.
- अजित शहाणे
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या वाट्यालाच ही वेळ येणे दु:खद आहे. त्यांच्या मागे त्यांची चळवळ नेटाने पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. आयुष्यभर त्यांच्या विचाराने वाटचाल करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वसामान्यांना बळ देण्यासाठी समाजातील जानकरांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- डी. एन. दोरगे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा