माजी नगरसेवकावर स्थानबद्धची कारवाई न्यायालयाने फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:46+5:302021-03-24T04:23:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील संग्राम चौकामध्ये एका कापड व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी एका माजी ...

माजी नगरसेवकावर स्थानबद्धची कारवाई न्यायालयाने फेटाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील संग्राम चौकामध्ये एका कापड व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी एका माजी नगरसेवकाला शिवाजीनगर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी न्यायालयात हजर केले. चंद्रकांत विष्णू शेळके (वय ४८, रा. संग्राम चौक) असे त्याचे नाव आहे; परंतु संबंधित व्यापाऱ्याने तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्याने स्थानबद्धची मागणी न्यायालयाने फेटाळली.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास संग्राम चौकातील शिवप्रसाद तोष्णीवाल या कापड व्यापाऱ्याच्या घरावर पाच-सहाजणांनी दगडफेक करून हल्ला केला होता. यामध्ये कार, बुलेट, स्कूटर व अन्य मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी तक्रार न झाल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता; परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शिवाजीनगर पोलिसांनी तपास करून याप्रकरणी चंद्रकांत शेळके याला ताब्यात घेतले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला १५ दिवस स्थानबद्ध करावे, यासाठी न्यायालयात हजर केले. दरम्यान, संबंधित व्यापाऱ्याने शेळके याचा यामध्ये सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने न्यायालयाने स्थानबद्धची मागणी अमान्य करत शेळके याची सुटका केली.