विमानतळ नामांतराचा प्रश्न मार्गी लावू
By Admin | Updated: August 1, 2014 00:35 IST2014-08-01T00:04:47+5:302014-08-01T00:35:52+5:30
शेट्टी यांचे आश्वासन : कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण; राजाराम महाराजांचे नाव देईपर्यंत पाठपुरावा करणार

विमानतळ नामांतराचा प्रश्न मार्गी लावू
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी राजाराम महाराज प्रेमींनी आज, गुरुवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विमानतळास राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या व्यापार वृद्धीसाठी विमानतळ निर्माण केले. त्यांनी केलेल्या या कार्याचा विसर पडू नये, यासाठी या विमानतळास राजाराम महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र, त्यावर प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही होत नाही. विमानतळ नामांतराच्या या प्रश्नात शासनाने लक्ष घालावे यासाठी झटणारे कार्यकर्ते गेल्या चार वर्षांपासून राजाराम महाराज यांच्या जयंतीदिनी व्हिनस कॉर्नर येथील त्यांच्या पुतळ्याखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करतात.
आज सकाळी १० वाजल्यांपासून उदयसिंह राजेयादव, अॅड. प्रताप जाधव, वसंत सिंघण, विजय जाधव, आदित्य मैंदर्गीकर, दिलीप टोणपे, बाळासाहेब निकम, शिवाजी सुदर्शनी, राजाराम पाटील, श्रीपती सोनावणे, अमृत पाटील, ज्ञानेश पोतदार, पिरमहंमद नवाब, अशोक सडोलीकर, आसिफ सय्यद, भास्कर सोरटे, श्रीपाद मराठे यांनी उपोषण केले.
जिल्हा परिषद, महापालिका, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा ठराव झाल्यानंतरही केंद्र्रीय विमान अधिपतन कार्यालय, नवी दिल्ली, एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी येथे संबंधित माहिती पाठविण्यास शासन स्तरावर प्रयत्न केले जात नाहीत. हा प्रस्ताव तातडीने मार्गी लागावा, अशी उपोषणकर्त्यांनी मागणी केली.
दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी याबाबतचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)