CoronaVirus News: कोल्हापूरमधील 123 गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 04:06 IST2021-04-08T04:06:13+5:302021-04-08T04:06:30+5:30
ग्रामस्थांची एकजूट, प्रशासनाची साथ, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे यश

CoronaVirus News: कोल्हापूरमधील 123 गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच
कोल्हापूर : ग्रामस्थांची एकजूट, प्रशासनाची साथ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या जोरावर जिल्ह्यातील १,२२५ गावांपैकी १२३ गावांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला कोरोनाची बाधा झालेली नाही. जिल्ह्यातील बारापैकी दहा तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असून, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील सर्वच गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात २६ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तो पुण्याहून कोल्हापुरात आला होता. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ५२ हजार ७५४ रुग्ण नोंदविण्यात आले असून, त्यापैकी ४९ हजार ८५२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १११४ जण उपचार घेत असून, आतापर्यंत १७८८ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात ३३ गावांमध्ये एकही रुग्ण नाही
सांगली : जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी केवळ ३३ गावांनीच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमलबजावणी करून कोरोनाचा संसर्ग गावाच्या वेशीवरच रोखला आहे. याकामी आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांची खूप मदत झाल्याचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील १०१ गावांना मागमूसही नाही
सातारा : जिल्ह्यातील १०१ गावांत कोरोनाचा शिरकावही झालेला नाही. जिल्ह्यातील १,४९२ पैकी १३९१ गावांत कोरोना विषाणू पोहोचलाय. यामध्ये सर्वाधिक बाधित गावे ही सातारा, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यांतच आहेत.
सिंधुदुर्गात ३१७ गावांत कोरोना नाही
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ३१७ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे, तर उरलेली ४२४ गावे ही कोरोनाबाधित झाली आहेत.
प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यामुळे आणि ग्रामस्थांनी एकजूट राखत चांगली भूमिका घेतल्यामुळेच हे शक्य झाले.
- भरमू जाधव, सरपंच, बिद्रेवाडी, जि. कोल्हापूर.