CoronaVirus Lockdown : क्वारन्टाईन खोलीत नाग घुसतो तेव्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 17:20 IST2020-05-29T17:19:02+5:302020-05-29T17:20:39+5:30
सकाळचे सहा. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील एका शैक्षणिक संस्थेत क्वारन्टाईन केलेल्या व्यक्तीला त्याच्या खोलीत पहाटे अस्सल नाग दिसल्याने त्याची भीतीने बोबडीच वळली. कसेबसे स्वत:ला सावरत त्याने हा प्रकार इतर खोलीत क्वारन्टाईन केलेल्या इतर व्यक्तींना उठवले. अखेर बोलावण्यात आलेल्या एका सर्पमित्राने या नागाला पकडल्यानंतर साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

CoronaVirus Lockdown : क्वारन्टाईन खोलीत नाग घुसतो तेव्हा
रवींद्र येसादे
उतूर/कोल्हापूर : सकाळचे सहा. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील एका शैक्षणिक संस्थेत क्वारन्टाईन केलेल्या व्यक्तीला त्याच्या खोलीत पहाटे अस्सल नाग दिसल्याने त्याची भीतीने बोबडीच वळली. कसेबसे स्वत:ला सावरत त्याने हा प्रकार इतर खोलीत क्वारन्टाईन केलेल्या इतर व्यक्तींना उठवले. अखेर बोलावण्यात आलेल्या एका सर्पमित्राने या नागाला पकडल्यानंतर साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यातून आजरा तालुक्यात आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येते. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील एका शैक्षणिक संस्थेत बाहेरुन आलेल्या सहाजणांना ठेवण्यात आले आहे. शाळेतील दोन खोल्यांमध्ये हे सहाजण गेल्या चौदा दिवसांपासून राहतात.
या शाळेतील स्वतंत्र खोलीत एकटाच राहत असणाऱ्या या युवकाच्या खोलीत आज सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला नागाचे दर्शन झाले. सरपटत चाललेल्या या नागाला पाहून या युवकाची बोबडीच वळली. कारण हा अस्सल नाग होता. त्याने कसेबसे स्वत:ला सावरुन शेजारील खोलीत असलेल्या युवकांना मोठ्याने ओरडून जागे केले.
या युवकांनी त्याच्या खोलीत जाऊन त्या नागाला आरडाओरड करून खोलीच्या बाहेर जाऊ दिले. दरम्यान, उत्तूर येथील सर्पमित्राला फोनद्वारे बोलावून घेण्यात आले, त्याने शिथापीने हा नाग पकडेपर्र्यत मात्र या सर्वच युवकांची पाचावर धारण बसली होती.
हा नाग सरपटत एका मोगऱ्याच्या झाडीत लपला. सर्पमित्राने त्याला अखेर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. या शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी शेतीवाडी आहे. तेथूनच हा नाग आला असावा, असा अंदाज आहे.