CoronaVirus Lockdown : आई-वडील आजारी, नातेवाईक वारले, प्रवासासाठी अनेकांची बनवेगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:30 IST2020-04-06T16:26:15+5:302020-04-06T16:30:47+5:30
प्रवास करायचा तर आहेच, पण ‘लॉकडाऊन’ असल्याने अनंत अडचणींचा डोंगर समोर आहे. अशा परिस्थितीतही पोलिसांची आॅनलाईन परवानगी हेच एकमेव हत्यार. पण ही परवानगी मिळवायची असेल तर तसे पटण्यासारखे कारणही देणे बंधनकारक. जिल्ह्यातील सुमारे १२०० हून अधिक जणांनी पोलिसांच्या आॅनलाईन परवानगी अॅपचा आधार घेतला. त्यात बनवाबनवीची कारणेही पुढे केल्याने पोलीसही संभ्रमात सापडले.

CoronaVirus Lockdown : आई-वडील आजारी, नातेवाईक वारले, प्रवासासाठी अनेकांची बनवेगिरी
कोल्हापूर : प्रवास करायचा तर आहेच, पण ‘लॉकडाऊन’ असल्याने अनंत अडचणींचा डोंगर समोर आहे. अशा परिस्थितीतही पोलिसांची आॅनलाईन परवानगी हेच एकमेव हत्यार. पण ही परवानगी मिळवायची असेल तर तसे पटण्यासारखे कारणही देणे बंधनकारक. जिल्ह्यातील सुमारे १२०० हून अधिक जणांनी पोलिसांच्या आॅनलाईन परवानगी अॅपचा आधार घेतला. त्यात बनवाबनवीची कारणेही पुढे केल्याने पोलीसही संभ्रमात सापडले.
आई-वडील आजारी आहेत, मुलाची तब्येत बिघडलीय, पत्नीची प्रकृती बिघडलीय, यासह जवळच्या नातेवाईकाला देवाघरीही पाठवल्याचे कारण पुढे करण्याची शक्कल लढवत पोलिसांना परवानगी देणे भागच पडले आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रथम जनता कर्फ्यू अन् त्यानंतर जमावबंदी, संचारबंदी व अचानक लॉकडाऊन झाल्याने अनेकांची कुचंबणा झाली. त्यात अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करावयाचा असल्यास पोलिसांची परवानगी बंधनकारक झाले. पण अशा काळात पोलीस हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या मदतीला धाऊन आले. पोलिसांनी त्या-त्या जिल्ह्यात आॅनलाईन परवानगी प्रणाली विकसित केली. लिंकही शेअर केली.
तातडीच्या, अत्यावश्यक कामांसाठी गरजवंतांनी या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलांच्या अॅपवर भराभर अर्ज केले, अन् प्रवासाचा मार्ग सुकर झाला. अनेकांना गावाकडे जायचे होते. कोल्हापूर जिल्ह्यातून ‘त्या’ लिंकवर सुमारे १२०० हून अधिक जणांनी अर्ज केले. बहुतांशी जणांना मुंबई-पुण्याहून शहरात यायचे होते. कारणेही तशीच शोधली.
कुणी आई आजारी आहे, भावाचा मृत्यू झालाय, गावाकडे मुलांची तब्येत बिघडलीय, शेतीच्या वाटणीवरून गावी वादावादी सुरू आहे अशी कारणे पुढे केली. काहींनी चक्क जवळच्या जिवंत असणाऱ्या अगर यापूर्वीच मृत व्यक्तींचे देहावसान झाल्याचे कारणही दाखविण्यास मागे-पुढे पाहिले नाही. पोलिसांच्या पोर्टलवर बनवाबनवीची कारणे देऊन अर्ज केल्यानंतर त्यांचे उत्तरही अवघ्या २४ तासांत पडताळणी होऊन मिळत असल्याने ही मंडळी ऐटीतच प्रवास करायला रिकामी होतात.
पोलिसांवर ताण
लॉकडाऊन काळात पोलीस हे घरदार सोडून रस्त्यावर राहिले. अतिरिक्त कामाचा ताण पोलिसांच्यावर वाढत आहे. इतरांचे संरक्षण करताना पोलीसही वैतागले. नागरिकांनीही पोलिसांशी संयमाने वागण्याची गरज निर्माण झाली आहे.
१८० प्रवास परवाने नाकारले
लॉकडाऊन काळात कोल्हापूर पोलिसांच्या अॅपवर सुमारे १२०० हून अधिकजणांनी प्रवास करण्यासाठी विविध कारणे दाखवत परवानगी मागितली होती. सुमारे १८० जणांची बनवाबनवीची कारणे पडताळणीत निदर्शनास आल्याने संबंधितांना परवानगी नाकारल्याचे समजते.
बनावट कारणे
- वडिलांचे देहावसान झाले
- गावाकडे घरी मारामारी झाली
- आईची तब्येत बिघडलीय
- वडील रुग्णालयात अॅडमिट आहेत
- पुतण्याचे निधन झाले
बनवेगिरी उघड
आॅनलाईन अर्ज दाखल झाल्यानंतर पडताळणी करताना पोलीस प्रशासनाने काही गावात ओळखीच्या ठिकाणी फोन करून खात्री केल्यानंतर अनेकांची बनवेगिरीची कारणे उघड झाली. अशा परवानगी नाकारल्या आहेत. बनवेगिरीची कारणे दाखविणाऱ्यांवर गुन्हे नोंदवणे अपेक्षित आहे, पण त्यामुळे पोलिसांच्या ताण-तणावात अतिरिक्त भर पडेल म्हणून त्यांना फक्त परवानगी नाकारून पिच्छा सोडविला आहे.