CoronaVirus Lockdown : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:11 IST2020-05-13T17:10:06+5:302020-05-13T17:11:34+5:30
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बुधवारी ७५ वर्षे झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बुधवारी ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर : शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बुधवारी ७५ वर्षे झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
सध्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट समोरील चौकात शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन १३ मे १९४५ रोजी झाले होते. त्या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण झाली; त्यानिमित्त दिवसभर विविध संघटनांच्यावतीने पुतळ्याला अभिवादन केले.
पूर्वी हा चौक विल्सन चौक/फेरिस चौक म्हणून ओळखला जात होता. या ठिकाणी १९२८ साली गव्हर्नर विल्सन यांचा पुतळा तत्कालीन ब्रिटिश राजवटीने उभा केला होता. स्वातंत्र्यलढ्यात १९४२ साली विल्सन यांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण करून नंतर तो फोडला गेला.
या ठिकाणी पुन्हा विल्सन यांचा पुतळा उभा करून नये म्हणून भालजी पेंढारकर यांच्या संकल्पनेतून कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अल्पावधीत तयार केला. १३ मे १९४५ रोजी दिमाखाने हा पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आला. त्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिवादन करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवत अभिवादन करण्यात आले. तर अन्य कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही.
यावेळी महापौर निलोफर आजरेकर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, वसंतराव मुळीक, आर. के. पोवार, नगरसेवक ईश्वर परमार, अर्जुन माने, जयंत देशपांडे, आनंद माने, प्रकाश पोवार, प्रा. शाम पोतदार, हसिना शेख, बाबा महाडिक, सर्जेराव देसाई, अॅड. अभिजित देशपांडे यांच्यासह विविध संघटनांतर्फे दिवसभर अभिवादन करण्यात येत होते.
योगदानाची दखल घ्यावी.....
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश राजवटीमध्येच हा छत्रपतींचा पुतळा उभा केला आहे. हा पुतळा उभा करण्यासाठी ज्यांचे योगदान आहे, त्यांची नावे या ठिकाणी लावण्यात यावीत, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष शरद तांबट यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.