CoronaVirus Lockdown : लक्षणे असतील तरच घेणार स्राव, नव्या नियमाने गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 17:34 IST2020-05-20T17:32:23+5:302020-05-20T17:34:50+5:30
शासनाच्या नव्या नियमानुसार आता रेड झोनमधून कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सरसकट व्यक्तींच्या घशातील स्राव घेतले जाणार नाहीत, तर तपासणीवेळी ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून येतील, फक्त त्यांच्याच घशातील स्रावाची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

CoronaVirus Lockdown : लक्षणे असतील तरच घेणार स्राव, नव्या नियमाने गर्दी ओसरली
कोल्हापूर : शासनाच्या नव्या नियमानुसार आता रेड झोनमधून कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सरसकट व्यक्तींच्या घशातील स्राव घेतले जाणार नाहीत, तर तपासणीवेळी ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून येतील, फक्त त्यांच्याच घशातील स्रावाची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
कोरोना या महामारीचा कहर महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात वाढत असताना तेथील नागरिकांचे लोंढे कोल्हापुरात आले. त्यामुळे कोल्हापुरात झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली. मुंबई, पुण्यासह रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांची सीपीआर रुग्णालयात तपासणी करून त्यांच्या सर्वांच्या घशातील स्रावांची चाचणी घेणे बंधनकारक होते.
त्यामुळे सीपीआर रुग्णालयामध्ये गेल्या आठवडाभरात तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. तपासणीसाठी प्रत्येकाचा रांगेत उभा राहून पूर्ण दिवस वाया जात होता. त्याचा ताण आरोग्य कर्मचाऱ्यांवर पडला होता.
पण शासनाच्या नव्या आदेशानुसार आता तपासणीसाठी आलेल्या नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळली तरच त्यांच्या घशातील स्रावाची चाचणी घेण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार सीपीआर रुग्णालयामध्ये स्राव तपासणीसाठी नागरिकांची गर्दी कमी झाली आहे.
नेहमीपेक्षा ७० टक्के गर्दी ओसरली
गेल्या आठवडाभरात सीपीआरमध्ये परजिल्ह्यांतील नागरिकांच्या घशातील स्राव घेण्यासाठी रांगा लागत होत्या. त्यावेळी दिवसभरात किमान ४०० ते ४५०० नागरिकांच्या स्राव चाचण्या घेतल्या जात होत्या.
नव्या नियमानुसार स्राव घेणार असल्याने आता ही गर्दी पूर्णपणे ओसरली असून, आता दिवसभरात फक्त २५ ते ३० जणांच्याच घशातील स्राव चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे तपासणीसाठी रांगांचे दिसणारे चित्र बदलले असून आता तुरळक नागरिकांची तपासणी होत आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा गर्दीचे प्रमाण किमान ७० टक्के ओसरल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला आहे.
स्राव चाचणी नाही, पण क्वारंटाईन बंधनकारक
मुंबई, पुण्यासह रेड झोनमधून आलेल्या नागरिकांत कोरोनाची लक्षणे दिसत नसले तरीही त्यांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करणे बंधनकारक आहे.