CoronaVirus : कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कातील ५९ जण निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:10 IST2020-06-09T12:09:11+5:302020-06-09T12:10:19+5:30
नर्सिंग होममधील डॉक्टरपाठोपाठ महिला कर्मचाऱ्यासही कोरोना झाल्याने रंकाळा टॉवर परिसरात सोमवारी भीतीचे वातावरण कायम राहिले. कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील अन्य एका रुग्णाच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतला आहे. रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर रस्ता सील केल्यामुळे पर्यायी मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली.

कोल्हापुरातील रंकाळा बसस्थानक ते रंकाळा टॉवर रस्ता बंद असल्यामुळे सोमवारी गोल सर्कल ते हरिमंदिर या मार्गावरील वाहतूक वाढली.
कोल्हापूर : नर्सिंग होममधील डॉक्टरपाठोपाठ महिला कर्मचाऱ्यासही कोरोना झाल्याने रंकाळा टॉवर परिसरात सोमवारी भीतीचे वातावरण कायम राहिले. कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील अन्य एका रुग्णाच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतला आहे. रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर रस्ता सील केल्यामुळे पर्यायी मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या डॉक्टरच्या संपर्कात आलेले कुटुंबीय, रुग्णालयातील कर्मचारी, घरातील कर्मचारी अशा ६० जणांचे अलगीकरण केले असून, त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी महिला कर्मचारी हिचा अहवाल पॉझिटिव्ह आला व इतरांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले. रुग्णालयासह सीपीआर, सावित्रीबाई फुले आणि एका खासगी रुग्णालयातील ६० जणांचा त्यामध्ये समावेश होता.
परिसरातील व्यवहार ठप्प
रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर हा मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केला आहे. येथील सर्व दुकाने बंद आहेत. याच परिसरात राष्ट्रीयीकृत बँक असून त्यांनी शाखेसह एटीएम सेंटरही बंद ठेवले आहे. व्यावसायिकांचे नुकसान होत असून परिसरातील नागरिकांनाही जीवनावश्यक वस्तूसाठी त्रास होत आहे.
रुग्णालयात प्रवेश बंद
कोरोनाबाधित डॉक्टरच्या रुग्णालयात सहा रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या जेवणाची सोय रुग्णालयाकडून करण्यात आली असून, कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. रुग्णालयामध्ये सिस्टर, कंपाऊंडर, वॉचमन आणि चालक असे चार कर्मचारी उपचारासाठी आहेत.