corona virus -वीज कर्मचाऱ्यांनी बजावली ‘जनता कर्फ्यू’त ही सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 16:31 IST2020-03-23T16:30:28+5:302020-03-23T16:31:59+5:30
जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे नागरिकांना घरात थांबविण्यासाठी वीजपुरवठा अखंडित ठेवणे महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘महावितरण’च्या प्रशासनाला अखंडित वीजपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.

corona virus -वीज कर्मचाऱ्यांनी बजावली ‘जनता कर्फ्यू’त ही सेवा
कोल्हापूर : जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे नागरिकांना घरात थांबविण्यासाठी वीजपुरवठा अखंडित ठेवणे महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘महावितरण’च्या प्रशासनाला अखंडित वीजपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.
‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता, उपअभियंता, वायरमन यांच्यासह फिल्डवरील कर्मचारी कार्यरत होते. जनता कर्फ्यूच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून वीज कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी चोख बजावली. त्यामुळे नागरिकांना घरातील सुखसुविधांचा वापर करता आला.
सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडमध्ये राहून ओळखपत्र ठेवण्यासह स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सर्वांनी त्याचे पालन केल्याचे दिसून आले. कर्फ्यूकाळात अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या विभागांसाठी टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्या. त्यामध्ये दिवसरात्र अखंडित वीजपुरवठा ठेवण्यासाठी झटणाऱ्या वीज कर्मचाऱ्यासाठीही टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शाहूपुरीतील वीजपुरवठा पूर्ववत
शनिवारी रात्री शाहूपुरी ११ केव्ही फीडरवरील जदुबन प्लाझाशेजारील ‘एचटी’ फोरवेमधील आऊटगोइंग केबल शॉर्ट झाली. त्यामुळे या केबलवरील पुढील भाग बंद केल्याने ट्रान्सफॉर्मरवरील घरगुती, औद्योगिक, व्यापारी असे ग्राहक बंद राहिले.
रविवारी सकाळी सर्व लाईनलाईन स्टाफ आणि अधिकारी यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात करून ते पूर्ण केले. यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. यामध्ये साहाय्यक अभियंता सचिन पाटील, मोहसीन किणीकर, मुख्य तंत्रज्ञ अनिल काजवे, प्रधान तंत्रज्ञ मनोज बगणे, तंत्रज्ञ राहुल नलवडे, रमेश एकशिंगे, तंत्रज्ञ मारुती गेडाम, शशांक नागदेवे, राजेश कदम, आदी सहभागी झाले होते.