corona virus : हॉटेलमध्ये बसून खाण्यासाठी परवानगी देणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 18:16 IST2020-09-08T18:15:11+5:302020-09-08T18:16:18+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृहांमध्ये बाहेरील ग्राहकांना बसून खाद्यपदार्थ खाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे अशा आस्थापनांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

corona virus : हॉटेलमध्ये बसून खाण्यासाठी परवानगी देणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा
कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्या हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृहांमध्ये बाहेरील ग्राहकांना बसून खाद्यपदार्थ खाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे अशा आस्थापनांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
महापालिका आयुक्त, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी ही कारवाई करायची आहे. याबाबतचे पत्र वरील अधिकाऱ्यांसह ग्राम व प्रभाग समित्यांनाही पाठविण्यात आले आहे. ३१ ऑगस्टच्या आदेशानुसार हॉटेल्स, लॉजेस (निवास व्यवस्था) १०० टक्के क्षमतेसह सुरू राहतील, असे नमूद केले आहे. मात्र, पार्सल सेवेची अट कायम आहे.
मात्र, जिल्ह्यातील काही रेस्टॉरंटस, खाद्यगृहांमध्ये बाहेरील ग्राहकांना बसून खाद्यपदार्थ खाण्यासाठी परवानगी दिली जात आहे तरी आयुक्त व मुख्याधिकारी नगरपालिका व ग्रामीण भागांमध्ये गटविकास अधिकारी, तहसीलदारांनी भारतीय दंडसहिता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येऊन दंडात्मक कारवाई करावी. याचप्रमाणे प्रभाग, समित्यांनी याबाबत माहिती द्यावी. पोलीस विभागामार्फतही महामार्ग, नागरी व ग्रामीण भागात करून संबंधित आस्थापनांवर कारवाई करावी.