corona virus : गडहिंग्लजच्या कोविड केंद्रात 'निगेटिव्ह' तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 19:16 IST2020-07-24T19:14:06+5:302020-07-24T19:16:11+5:30
कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असतानाही येथील एका खाजगी दवाखान्यातील समर्पित कोविड आरोग्य केंद्राच्या बाथरूममध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली

corona virus : गडहिंग्लजच्या कोविड केंद्रात 'निगेटिव्ह' तरुणाची आत्महत्या
गडहिंग्लज : कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असतानाही येथील एका खाजगी दवाखान्यातील समर्पित कोविड आरोग्य केंद्राच्या बाथरूममध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुधीर दत्तात्रय येसरे ( ३५ रा. लिंगनूर कसबा नूल ता. गडहिंग्लज)
असे त्याचे नाव आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (२२) ताप व थकवा आल्यामुळे दोन दिवसापूर्वी सुधीर हा येथील शेंद्री माळावरील कोवाड केंद्रात स्वतःहून तपासणीसाठी आला होता. त्याचा मोठा भाऊ यशवंत हादेखील त्याच्यासोबत होता.
गुरूवारी (२३)सुधीर व यशवंत दोघांचेही स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होते. दरम्यान,कोविड केंद्राच्या जवळच असलेल्या एका खाजगी दवाखान्यातील समर्पित कोविड आरोग्य केंद्रात त्यांना ठेवण्यात आले होते.
आज शुक्रवारी (२४) दुपारी सुधीर व यशवंत दोघांच्या कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला. दोघांनाही त्याची माहिती देण्यात आली होती. दुपारच्या जेवणानंतर बाथरूमला जाऊन येतो, असे सांगून तो बाथरूममध्ये गेला.
पॅन्ट व बनियनच्या सहाय्याने गळफास तयार करून बाथरूमच्या चौकटीला त्याने गळफास घेतला. बराच वेळ तो बाहेर न आल्यामुळे त्याचा भावाने आणि कर्मचाऱ्यांनी बाथरूममध्ये डोकावून पाहिले असता त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तो अविवाहित आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील व भाऊ असा परिवार आहे.
घटनास्थळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मल्लिकार्जुन अथणी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी भेट दिली.