corona virus : कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी विमा संरक्षण :मंत्री हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:19 IST2020-08-19T15:18:13+5:302020-08-19T15:19:22+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणाऱ्या, ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

corona virus : कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी विमा संरक्षण :मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणाऱ्या, ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
या संदर्भातील शासन परिपत्रक काढण्यात आले असून, सर्व जिल्हा परिषदांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, शासनाने कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार उदा. दहन, दफन करणाऱ्या व्यक्ती आपल्या व कुटुंबीयांच्या काळजीने काम करण्यास घाबरतात. मात्र काही सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी हा पवित्र विधी करण्यास धाडसाने पुढे येत आहेत.
या धाडसी कोरोना योद्ध्यांना ३० सप्टेंबरपर्यंत विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येईल. कोरोना संदर्भातील गांभीर्य, परिस्थिती पाहून ३० सप्टेंबरनंतरही विमा कवच मुदत वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
संबंधित सामाजिक संस्था, संघटना यांच्या कर्मचाऱ्यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कर्मचारी त्याच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहिजे, अशा काही अटींच्या अधीन राहून हे विमा संरक्षण देण्यात येत आहे.