corona virus -बाबांनो तुम्हाला चांगले आरोग्य लाभो...ड्युटीवरील पोलिसांचे औक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 15:57 IST2020-03-23T15:55:58+5:302020-03-23T15:57:46+5:30
‘बाबांनो, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो’ हे शब्द आहेत एका माउलीचे. ‘जनता कर्फ्यू’साठी गस्तीवर असणाऱ्या ‘आयबाईक’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करतेवेळी या महिलेने काढलेले हे उद्गार.

जनता कर्फ्यूसाठी गस्तीवर असलेल्या ‘आयबाईक’ पथकाचे प्रमुख संदीप जाधव यांच्यासह सहकाºयांचे कोल्हापुरातील दौलतनगरातील आक्काताई शामराव चव्हाण या माउलीने औक्षण केले.
कोल्हापूर : ‘बाबांनो, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो’ हे शब्द आहेत एका माउलीचे. ‘जनता कर्फ्यू’साठी गस्तीवर असणाऱ्या ‘आयबाईक’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करतेवेळी या महिलेने काढलेले हे उद्गार. दौलतनगरातील तीन बत्ती चौक परिसरातील एका घरातील रविवारचे हे भावनिक चित्र. या मायेच्या ओलाव्याने पोलिसांनाही गदगदून आले.
जनता कर्फ्यूसाठी आयबाईक पथकाचे प्रमुख संजय जाधव यांच्यासह किशोर धूम, गौरव चौगले, सुनील घुमई हे कर्मचारी गस्तीवर होते. हे पथक दौलत नगरातील तीन बत्ती चौक येथे गेल्यावर एका घरातून त्यांना बोलविण्यात आले. काही भांडण वैगेरे झाले आहे का? अशा समजुतीनेच पोलीस या घरी गेले. त्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
समोर एक माउली हातात आरतीचे ताट घेऊन औक्षणासाठी उभी होती. आक्काताई शामराव चव्हाण असे त्यांचे नाव आहे. ‘बाबांनो, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो’ असे म्हणत त्यांनी या पोलिसांचे औक्षण केले.
अचानकपणे अशा पद्धतीने औक्षण झाल्याने पोलीसही गदगदून गेले. आम्ही कर्तव्यावर असताना त्याची दखल घेऊन या माउलीने केलेल्या ओवाळणीने आम्हाला समाधान वाटले, अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या.