corona virus : दहा दिवस मिळविलेले एका दिवसात घालवू नका : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:55 IST2020-09-14T18:54:32+5:302020-09-14T18:55:33+5:30
कागल व गडहिंग्लज तालुक्यातील जनतेने गेल्या दहा दिवसांत जनता कर्फ्यूमध्ये घरात राहून जे मिळवले, ते कर्फ्यू उठल्यानंतर एका दिवसात गमावू नका, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून केले. जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल जनतेप्रती कृतज्ञताही व्यक्त केली

corona virus : दहा दिवस मिळविलेले एका दिवसात घालवू नका : मुश्रीफ
कोल्हापूर : कागल व गडहिंग्लज तालुक्यातील जनतेने गेल्या दहा दिवसांत जनता कर्फ्यूमध्ये घरात राहून जे मिळवले, ते कर्फ्यू उठल्यानंतर एका दिवसात गमावू नका, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून केले. जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल जनतेप्रती कृतज्ञताही व्यक्त केली.
शासनाच्या आदेशाशिवाय जनतेने स्वयंस्फूर्तीने कोरोनाचा कहर आवाक्यात आणायचाच व संसर्गाची साखळी तोडावयाचीच, हा दृढनिश्चय करून सर्वांनी कागल तालुक्यात ६ ते १५ सप्टेंबर २०२०, गडहिंग्लज तालुक्यात ७ ते १६ सप्टेंबर २०२० पर्यंत जनता कर्फ्यू पुकारला व सर्वांनी यशस्वी करून दाखविला.
यामध्ये व्यापाऱ्यांनी, छोट्या हातगाड्या व छोट्या व्यावसायिकांनी या जनता कर्फ्यूसाठी प्रसंगी नुकसान सोसून जे सहकार्य केले, त्यालाही तोड नाही, त्यांचेही आभार व सर्वांच्यापुढे मी नतमस्तक होत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
आता जनता कर्फ्यू उठणार आहे. लगेच खरेदी, जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी रस्त्यावर, बाजारांमध्ये चौकाचौकांमध्ये गर्दी करू नका. गर्दी केली तर सर्वांनी १० दिवस घरामध्ये राहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे प्रयत्न केलेत, त्याची फलनिष्पती होणार नाही.
दहा दिवसांत घरामध्ये राहून मिळविले आहे, ते एका दिवसात गर्दी करून घालवू नका. याबाबत प्रशासन, नगरपालिका, पोलिसांना कठोरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.