corona in kolhapur-कोल्हापुरात कोरोना चाचणीसाठी आठवड्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:41 IST2020-04-20T15:38:16+5:302020-04-20T15:41:22+5:30
कोरोना विषाणूची चाचणी करता येणारे सीबी नॅट हे नवीन यंत्र कोल्हापुरात दाखल झाले. पण इतर तांत्रिक सुविधा पूर्ततेनंतर आठवड्यात ‘कोरोनां’बाबत रुग्णांच्या घशातील स्रावच्या चाचण्या करता येणार आहेत.

corona in kolhapur-कोल्हापुरात कोरोना चाचणीसाठी आठवड्याची प्रतीक्षा
कोल्हापूर : कोरोना विषाणूची चाचणी करता येणारे सीबी नॅट हे नवीन यंत्र कोल्हापुरात दाखल झाले. पण इतर तांत्रिक सुविधा पूर्ततेनंतर आठवड्यात ‘कोरोनां’बाबत रुग्णांच्या घशातील स्रावच्या चाचण्या करता येणार आहेत.
सद्य:स्थितीत पुण्यातील राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्था आणि मिरज येथून चाचण्या करण्यात येत आहेत.
कोरोनाची व्याप्ती वाढू लागल्याने रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सीपीआर हे कोल्हापूरच्या आरोग्य विभागाचे मुख्य केंद्र मानले जाते. या कोरोनाच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे सीबी नॅट हे नवीन स्वयंचलित यंत्र हे शनिवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. सुमारे ८० लाख रुपये अशी या यंत्राची किंमत आहे. सीपीआरमधील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे यंत्र बसविण्यात येणार आहे.
हे अद्ययावत यंत्र आले असले तरीही अद्याप चाचणीचे कार्टेज, पायाभूत सुविधा उपलब्ध करणे तसेच लॅब सुरू करण्यासाठी आयसीएमआरची मान्यता मिळविणे यासाठी प्रशासनाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरच हे यंत्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे नवीन यंत्र सुरू करण्यासाठी किमान आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतच ‘कोरोना’बाधित रुग्णाच्या घशातील स्रावाची तपासणी करता येणार आहे.
किमान हजार चाचण्या
केंद्र सरकारकडून हे यंत्र देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत पुणे आणि मिरजकडून चाचण्यांचे अहवाल मिळत आहेत. पण राज्यभर कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्या राष्ट्रीय विषाणू चाचणीची वाढती संख्या पहाता पुणे आणि मिरज येथे प्रयोगशाळेत रुग्णांच्या घशातील स्राव चाचणीसाठी पाठवावे लागत आहेत. पण तेथेही चाचणीचा भार वाढल्याने रुग्णांच्या स्राव चाचणीची प्रतीक्षा करावी लागत आहे. सीपीआर रुग्णालय आवारात ही सोय झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.