corona in kolhapur -पुरवठा विभागाकडून १२ हजार टन गहू, तांदूळ उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:17 IST2020-04-03T19:15:24+5:302020-04-03T19:17:43+5:30
संचारबंदीमुळे हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या अंत्योदय कुटुंबांच्या मदतीला सरकार धावून आले. गेल्या दोन दिवसांपासून रेशनच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचे वितरण सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेतच सकाळपासून रांगा लावून महिलांनी रेशनचे धान्य घेतले.

अंत्योदय कार्डधारकांसाठी रेशन धान्याचे वितरण सुरू झाले आहे. राजारामपुरी विद्यापीठ रोडवरील स्वस्त धान्य दुकानांत रेशन घेण्यासाठी महिलांनी अशी रांग लावली होती. कोरोनाच्या धसक्याने रांग लावतानाही विशेष दक्षता घेण्यात आली होती. (आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : संचारबंदीमुळे हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या अंत्योदय कुटुंबांच्या मदतीला सरकार धावून आले. गेल्या दोन दिवसांपासून रेशनच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचे वितरण सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेतच सकाळपासून रांगा लावून महिलांनी रेशनचे धान्य घेतले.
कोरोनामुळे गेल्या दहा दिवसांपासून सलगपणे जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. आधीच हातावरचे पोट, त्यात रोजगार हिरावल्याने उधार उसनवारी करीत कुटुंब जगविण्याची कसरत सुरू होती. आजही अनेक कुटुंबांतील चूल रेशनचे धान्य मिळाल्यावरच पेटते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे धान्य कधी येते याची प्रतीक्षा होती.
गोरगरिबांचे हाल कमी व्हावेत म्हणून रेशनचे तीन महिन्यांतील धान्य एकदम देण्याचा निर्णय झाला होता, तथापि हे धान्य ठेवण्यासाठी गोडावून आणि वाहतुकीच्या साधनांचा अडथळा असल्याने दर महिन्याचे रेशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यासाठी जिल्ह्यातील ५ लाख आणि शहरातील ५७ हजार अंत्योदय कार्डधारकांना माणसी प्रती किलो २ रुपयांप्रमाणे गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिमाणसी तांदूळ देण्यास सुरुवात झाली.
जिल्ह्यातील १५५० आणि शहरातील १६६ दुकानांना जिल्हा पुरवठा विभागाकडून १२ हजार टन इतके धान्य पोहोचविण्यात आले. त्याचे वितरण लागलीच सुरू करण्यात आले. बोटांचे ठसे घेतल्याशिवाय रेशन दिले जात नव्हते, पण आता ठसे घेण्यास पॉस मशीन वापरण्यास मनाई असल्याने पूर्वीप्रमाणे कार्ड पाहून धान्य दिले गेले.