corona in kolhapur-उचतच्या ‘त्या’ युवकाच्या आईलाही कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:10 IST2020-04-11T19:04:19+5:302020-04-11T19:10:33+5:30
दोन दिवसांपूर्वी मलकापूरनजीकच्या उचत (ता. शाहूवाडी) गावातील एका युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझीटिव्ह आला होता; त्याच्या ४९ वर्षीय आईलाही ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोरोना’ची लागण झालेल्यांची संख्या ६ पर्यंत पोहोचली आहे. ‘कोरोना’बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

corona in kolhapur-उचतच्या ‘त्या’ युवकाच्या आईलाही कोरोनाची लागण
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी मलकापूरनजीकच्या उचत (ता. शाहूवाडी) गावातील एका युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझीटिव्ह आला होता; त्याच्या ४९ वर्षीय आईलाही ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोरोना’ची लागण झालेल्यांची संख्या ६ पर्यंत पोहोचली आहे. ‘कोरोना’बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
मलकापूर-अनुस्कुरा मार्गावर मलकापूरपासून सुमारे तीन किमी अंतरावर उचत हे गाव आहे. दिल्लीतील मरकजला जाऊन आलेल्या उचतच्या तरुणाच्या स्वॅबचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या घरातील आई-वडील, पत्नी व दोन मुलांनाही ‘होम क्वारंटाईन’ करून त्याचा स्राव मिरज येथे तपासणीसाठी पाठविले होते.
त्यापैकी पत्नी, दोन मुलांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर वडिलांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. पण त्याच्या ४९ वर्षीय आईचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. त्या गृहिणी आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ‘सीपीआर’च्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, तो युवक ज्या गावात फिरला त्या गावातील नागरिकही भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा आरोग्य प्रशासनास १३ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये १२ निगेटिव्ह आले; तर उचतच्य त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय शनिवारी सकाळी आणखी तिघांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
डॉक्टरांचीही तपासणी
मरकजहून आल्यानंतर उचतचा तो युवक धार्मिक कार्यासाठी सरूड, भेडसगाव, कापशी अशा गावांत नातेवाईकांकडे फिरल्याचे बोलले जाते. त्यावेळी त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याने सरूड येथील एका डॉक्टरांकडून उपचार घेतले. त्या डॉक्टरलाही तपासणीसाठी आरोग्य प्रशासनाने ताब्यात घेऊन पन्हाळा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यांच्याही घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले आहेत.
पाचही रुग्णांची प्रकृती सुधारतेय
जिल्ह्यात यापूर्वीच्या पाचही पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. पेठवडगाव येथील युवतीवर मिरज येथे उपचार सुरू असून, त्यांचे दोन्हीही तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर भक्तिपूजानगरातील पुण्याच्या व्यक्तीचाही एक अहवाल निगेटिव्ह तर दुसरा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तर त्याच्या बहिणीची शनिवारी व रविवारी पुन्हा तपासणी करून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तर उचतच्या त्या युवकाचीही प्रकृतीही स्थिर आहे.