corona in kolhapur -कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकांचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 20:12 IST2020-03-26T20:11:10+5:302020-03-26T20:12:22+5:30
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह वैद्यकीय यंत्रणांद्वारे सुरू असलेल्या प्रयत्नांना अनेकांचा हातभार लागत आहे. शहरासह स्वयंसेवी संस्था व संघटनांसह काहीजण व्यक्तिगत स्तरावर आपल्या पातळीवर मदत करीत आहेत.

कोल्हापुरातील सायबर चौक येथे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जीपवर स्पीकर लावून कोरोना विषाणूबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.
कोल्हापूर : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह वैद्यकीय यंत्रणांद्वारे सुरू असलेल्या प्रयत्नांना अनेकांचा हातभार लागत आहे. शहरासह स्वयंसेवी संस्था व संघटनांसह काहीजण व्यक्तिगत स्तरावर आपल्या पातळीवर मदत करीत आहेत.
व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट
राजारामपुरी येथील दौलतनगर, राजेंद्रनगर या परिसरात झोपडपट्टीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कोरोनाबाबत जनजागृती केली जाते आहे. या शासकीय यंत्रणेला हातभार लावण्यासाठी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जीपवर स्पीकर लावून कोरोना विषाणूबाबत कशी काळजी घ्यावी, स्वत:ची व घराची स्वच्छता कशी करायची याबाबत जीप फिरविली जाते.
या परिसरात कामगार वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवीत असल्याचे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी सांगितले. या उपक्रमाचे उद्घाटन सायबर चौक येथे पोलीस निरीक्षक सुनीता घुगे, अनिता मेनकर, अभिजित गुरव, डॉ. संगीता निंबाळकर, बाळासो नांदरे, दिलीप पाटील यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘योजना’ज फूड बाईट्स
सामाजिक बांधीलकीच्या नात्याने ‘योजना’ज फूट बाईट्स यांच्या वतीने गरजू लोकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. गरजू लोकांनी या ठिकाणी फोन केल्यास त्यांना जेवण मोफत दिले जाते. गरजू लोक ७५८८११३२३२ या क्रमांकावर संपर्क करून जेवण घेऊन जाऊ शकतात.
वैयक्तिकरीत्या प्रत्येकाला आम्ही जेवण पोहोच करण्याकामी आम्हांला मर्यादा येते. किती लोकांचे जेवण पाहिजे यांची पूर्वकल्पना देऊन गरजूंसाठी ते जेवणाचे पार्सल घेऊन जाऊ शकतात, असे आवाहन नरसिंगानी यांनी केले आहे. अनेकांच्या वतीने नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात येत आहे.