corona in kolhapur - How does a patient at the door get rejected? | corona in kolhapur - दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो?, यड्रावकर यांनी विचारला जाब

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शनिवारी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. योगेश साळे, डॉ. बी. सी. केम्पीपाटील उपस्थित होते.

ठळक मुद्दे दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो?, यड्रावकर यांनी विचारला जाब‘लोकमत’च्या बातमीची घेतली दखल

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने एकदा ठरवून दिल्यानंतर रुग्णालयाच्या दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो, असा संतप्त सवाल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित केला. महापालिका क्षेत्रातील रुग्णालये असे करणार असतील तर तसा अहवाल आयुक्तांना पाठवा. उद्याच्या उद्या सर्वसामान्य रुग्णांना मदत करणारे हेल्पलाईन नंबर जाहीर करा, असे स्पष्ट आदेश यड्रावकर यांनी दिले.

यड्रावकर यांनी शनिवारी सकाळी सीपीआरमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. ‘लोकमत’मध्ये शनिवारीच ‘सीपीआर बंद, उपचार कुठे, खर्च कोण करणार?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत मंत्र्यांनी याबाबत दिवसभरामध्ये योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकि त्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्र्यांनी कामगार विमा रुग्णालयाचे सध्या काय चालले आहे, अशी विचारणा केली. तेव्हा त्यांची बाह्यरुग्ण सेवा सुरू आहे. मात्र, त्यांनी तेथे खुदाई करून ठेवली आहे. अजून दोन महिने काम चालेल, असे डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितल्यानंतर यड्रावकर भडकले. ‘गेले दीड महिना कोरोनाचा गोंधळ सुरू आहे. कुणालाच जबाबदारी घ्यायला नको? असे उद्विग्न उद्गार त्यांनी काढले. त्यांच्याकडे जे ४५ डॉक्टर्स आणि कर्मचारी आहेत, ते नियमित कामासाठी घेण्याबाबत पत्र तयार करण्याच्याही सूचना यड्रावकर यांनी दिल्या.

वैद्यकीय महाविद्यालयातील पीपीई किट, ग्लोव्हज्, मास्क ची स्थिती त्यांनी जाणून घेतली. इचलकरंजीतील पीपीईमध्ये काही सुधारणा केल्यास ते किट उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. जे आवश्यक साहित्य येथे कमी आहे, ते जिल्हा परिषदेकडून दिले जाईल, तशी मागणी द्या, असे डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.
 

 

Web Title: corona in kolhapur - How does a patient at the door get rejected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.