corona virus : 'कोरोना'ने घेतला सहा शिक्षकांचा बळी! गडहिंग्लजकरांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:06 IST2020-09-24T15:03:23+5:302020-09-24T15:06:26+5:30
कोरोनाच्या महामारीत दीड महिन्यात गडहिंग्लज तालुक्यातील एका प्राचार्यांसह ६ शिक्षक आणि एका लेखनिकाचा बळी गेला.हे सर्वजण पन्नाशीतील होते. त्यामुळे शिक्षणक्षेत्रासह तालुक्याला मोठा धक्का बसला आहे.

corona virus : 'कोरोना'ने घेतला सहा शिक्षकांचा बळी! गडहिंग्लजकरांना धक्का
राम मगदूम
गडहिंग्लज : कोरोनाच्या महामारीत दीड महिन्यात गडहिंग्लज तालुक्यातील एका प्राचार्यांसह ६ शिक्षक आणि एका लेखनिकाचा बळी गेला.हे सर्वजण पन्नाशीतील होते. त्यामुळे शिक्षणक्षेत्रासह तालुक्याला मोठा धक्का बसला आहे.
६ ऑगस्टला गडहिंग्लज शहरातील दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयाचे शिक्षक भोला पानारी (वय -४८,रा. हलकर्णी) यांचे निधन झाले. ते कोरोनाचे तालुक्यातील पहिले बळी ठरले. कंटेनमेंट झोनच्या ठिकाणी सेवा बजावताना त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. २९ ऑगस्टला येथील शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.जे. देसाई यांचे उपचाराच्या दरम्यान साताऱ्यात कोरोनाने निधन झाले.
१३ सप्टेंबरला येथील ओंकार महाविद्यालयाचे लेखनिक राजेंद्र तराळ( वय ५३, रा.गडहिंग्लज) यांचे निधन झाले. ते हलकर्णी येथील कोरोना चेकपोस्टवर काम करत होते. १६ सप्टेंबरला नूल येथील इंदिरादेवी जाधव हायस्कूलचे शिक्षक दुंडाप्पा कोळी (५४) यांचे निधन झाले. ते हनिमनाळ येथील कोरोना चेक पोस्टवर काम करत होते.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी झटताना बळी गेलेल्या शिक्षकांच्या वारसांना शासनाकडून भरीव मदत मिळावी, अशी मागणी येथील विविध पक्ष - संघटनांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली आहे.
मोहिमेतील शिक्षकांचा मृत्यू !
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत गडहिंग्लजमध्ये सर्वेक्षण करणारे गडहिंग्लज हायस्कूलचे शिक्षक भीमराव कांबळे (वय ५५ रा. कोल्हापूर ) यांचे १० सप्टेंबरला निधन तर बसर्गे येथील प्राथमिक शिक्षक सुधाकर सुतार (वय-५५,रा.नरेवाडी )यांचे २२ सप्टेंबरला निधन झाले.
मुलांचे शिक्षण, शुभमंगल होण्यापूर्वीच..!
कुणाच्या मुलांचे शिक्षण सुरू असतानात तर कुणाच्या मुलांच्या मंगल कार्याची तयारी सुरू असताना ते अकस्मिक गेले.त्यामुळे वयोवृद्ध आई-वडिलांसह त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.